म्हैसाळ विस्तारित योजनेला मंजूरी द्या ; माजी आमदार विलासराव जगताप | अन्यथा शेतकऱ्यासह मोर्चा काढू

जत,संकेत टाइम्स : जतच्या‌ म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनी सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.पंधरा दिवसात योजनेला मंजूरी द्यावी,अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मोठा मोर्चा काढू,असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे.तसे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.यासंदर्भात माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन यांची माहिती पत्रकारांना दिली आहे. यावेळी माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, जत तालुक्यात सुरू असलेले म्हैसाळ योजनेते काम सध्या संथ गतीने सुरू आहे.कामात गती नसल्याने तालुक्यातील उर्वरीत 48 गावाला पाणी केव्हा मिळणार यांची प्रतिक्षा आहे.या योजनेला मंजुरी मिळेल का नाही याबाबतही शंका आहे.


जत तालुक्यातील पूर्व भागातील 48 गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत.या उर्वरीत गावांना पाणी मिळाल्या शिवाय जत तालुक्याचे नांव दुष्काळ यादीमधुन जाणार नाही.यासाठी या राहीलेल्या 48 गावांना व अल्पशा पाणी मिळालेल्या 17 गावांना अशा एकूण 65 गावांना म्हैसाळ
योजनेच्या बेडग येथून पाणी उचलून देणे शक्य आहे.यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसाळ विस्तारीत योजनेला तत्वतः मान्यता दिली होती. परंतु त्याची पुढील कार्यवाही ही अद्याप झालेली नाही.या संदर्भामध्ये माजी आमदार जगताप यांनी मंत्री जयंत पाटील यांची वारणाली येथे भेट घेत वस्तूस्थिती ‌मांडली होती. त्यावेळी अधिक्षक अभियंता श्री.गुणाले,कार्यकारी अभियंतेही उपस्थित होते.यावेळी सविस्तर चर्चा झाली होती. तशा आशयाच्या बातम्या स्थानिक वृत्तमान पत्रामध्येही प्रकाक्षित झाल्या होत्या.त्यावेळी ही योजना मंजूर करु असा शब्द दिला होता.त्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारचे विश्वासाचे वातावरण तयार झाले होते.परंतु त्यानंतर मोठा कालावधी झाला आहे.लोकांमध्ये साशंकता वाढु लागली आहे.आपणावर तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास आहे,आपण त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.आपल्या‌ विभागाच्या अधिन असलेल्या विस्तारीत म्हैसाळ योजनेला पंधरा दिवसात मंजूरी द्यावी, अन्यथा सर्व पक्षाच्या वतीने (जे येतील ते पक्ष) यांना घेऊन उपविभागीय अधिकारी जत कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा आयोजित केला जाईल,असा इशाराही माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे.