लाचखोर पुरवठा अधिकारी यांना निलंबित करा | रेशनकार्डसाठी तीनशे रुपये लाच प्रकरण

बहुजन रयत पार्टीची मागणी 

तासगाव : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी सुजाता ढेरे यांनी वायफळे (ता. तासगाव) येथील एकाकडून दुबार रेशन कार्ड काढून देण्यासाठी 300 रुपये लाच घेतल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणी ढेरे यांना निलंबित करा, या मागणीसाठी मागणी बहुजन रयत पार्टीने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

याबाबत माहिती अशी, वायफळे येथील एकाने पुरवठा अधिकारी सुजाता ढेरे यांच्याकडे तो दुबार रेशन कार्डसाठी अर्ज केला होता. दुबार कार्डबरोबरच या कार्डात काहींची नावे वाढवायची व कमी करायची होती. संबंधिताने त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज ढेरे यांच्याकडे दिला होता. 

       

मात्र रेशनकार्ड देताना ढेरे यांनी संबंधित व्यक्तीला 'रेशनकार्ड हवे असेल तर 300 रुपये लाच द्यावी लागेल', अशी मागणी केली. त्यानंतर ढेरे यांनी तक्रारदाराकडून तीनशे रुपयांची लाच स्वीकारलीही. ही लाच त्यांनी थेट आपल्या पर्समध्ये कोंबली. याप्रकरणी संबंधीताने तहसिलदार कल्पना ढवळे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे लाचखोर पुरवठा अधिकारी सुजाता ढेरे यांच्याबाबत लेखी तक्रार केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी ढेरे यांच्याबाबत थेट मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.

     

या तक्रारी करून अनेक दिवस उलटले तरी लाचखोर ढेरे यांच्यावर अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. तहसीलदार ढवळे यांनी ढेरे यांना नोटीस काढून खुलासा मागविला आहे. हा खुलासा पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे त्या सांगतात. मात्र नोटीस काढून केवळ खुलासा मागणी करणे ही कागदोपत्री आणि जुजबी कारवाई आहे. 

      


वास्तविक ढेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याकरिता तक्रारदार व साक्षीदार यांचे जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. हे जबाब पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवले पाहिजेत. शिवाय ढेरे यांनी पुरवठा विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांचा तपास करावा. त्यांच्या संपत्तीची तपासणी करावी. वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांच्या सगळ्या कारनाम्यांची सखोल तपासणी व्हावी, अशी मागणी बहुजन रयत पार्टीने केली आहे. या मागण्यांसाठी प्रशांत केदार यांनी येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलनास सुरुवात केली.