जत‌चे नवे तहसील कार्यालय आठ दिवसात‌ बनले दलालाचा अड्डा | नागरिकांना उभे राहण्याची शिक्षा,दलालांना खुर्चा |

0



जत,प्रतिनिधी : जत तहसिलदार कार्यालयातील आर.टी.एस.विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच 

अन्य विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून दुष्काळी जत तालुक्यातील पक्षकार व शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू असून या कर्मचा-यांची भाषा ही मग्रुरीची आहे.तहसील कार्यालयातील अशा विभागात अनेक दलाल तयार करण्यात आले आहेत.त्यांच्याकडून आलेल्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे सामान्य जनतेचा छळ केला जात आहे,अशा या कर्मचा-यांची जिल्हाधिकारी यांनी त्वरित उचलबांगडी करावी अशी मागणी तालुकावासियांतून करण्यात येत आहे.






नव्याने जत‌ गोडावूनमध्ये हलविण्यात आलेले कार्यालय पुन्हा दलालाचा अड्डा बनला असून दलाल थेट कार्यालयात वावरत आहेत.हे थेट अधिकाऱ्यांना दिसत असूनही लक्ष्मीदर्शन होत असल्याने त्यांचे हाताची घडी तोंडावर बोट अशी स्थिती आहे.

कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने हंगामी कर्मचारी नेमले आहेत, तेच आता साहेब होऊन बसले असून  विविध कामानिमित्त आलेल्या पक्षकांराशी उद्धट वर्तन करताना दिसत आहेत.पक्षकारांना ताटकळत ठेवणे. त्यांच्याकडून शासकिय फि पेक्षा जास्त पैसे घेणे.पैसे दिले नाहीतर त्यांना हेलपाटे घालायला लावणे अशी कामे करित आहेत. 




Rate Card



हंगामी कर्मचारी यांच्या अशा वागण्यामुळे पक्षकार वैतागून गेले आहेत. तसेच महसुल विभागातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये घेण्यासाठी हे कर्मचारी पक्षकार व दुष्काळग्रस्त शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करित आहेत.तो विभाग सर्वाधिक लुटीचा अड्डा बनला असून येथे नेमलेला कर्मचारीच तहसीलदार होऊन बसल्याची चर्चा आहे.शेतकऱ्यांना बाहेर व्हा म्हणून सांगताना दलालांना मात्र खुर्ची देऊन अकलेचे तारे तोडत आहे. जत तहसिलदार कार्यालयातील आर.टी.एस.विभागातील अधिकारी व कर्मचारी हे विविध प्रकारच्या परवानग्या देणे,वाटप प्रकरणे तसेच अन्य प्रकरणी पक्षकारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक नव्हे थेट हाजारोने लुट केली जात आहे.






येथील कर्मचारी हे वाटप प्रकरणी पक्षकारांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची लुबाडणूक करित आहेत.पुणे विभागाचे महसुल आयुक्त यांनी वाटप प्रकरणे ही विनामूल्य करून दिली जातील असे आदेश दिले असतानाही आर.टी.एस.विभागातील हे कर्मचारी पक्षकारांकडून दलाला मार्फत एका वाटप प्रकरणासाठी वीस ते पन्नास हजार रूपये कशासाठी घेतात याचीही चौकशी व्हावी.तालुक्यातील काही गावातील पक्षकारांनी मागील वर्षी वाटपाची प्रकरणे आर.टी.एस.विभागाकडे सादर केली आहेत. तसेच वाटप मंजूर करण्यासाठी सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सर्व रक्कम ही पोहोच केली आहे.





तरीही या पक्षकारांची वाटपाची प्रकरणे मंजूर झाली नाहीत याचे कारण काय?एकंदरीत जत तहसिलदार कार्यालयात सर्वच विभागात सावळा गोंधळ सुरू असून तहसिलदार यांचे या गोंधळाकडे दुर्लक्ष होत आहे. 

या प्रकरणी जतचे उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे व दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील पक्षकार व शेतकरी यांची होणारी लुबाडणूक थांबवून दुष्काळग्रस्त पक्षकारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा जत तालुक्यातील पक्षकार व  दुष्काळग्रस्त शेतकरी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.