बेसुमार वाळू उपशाने नद्यांचे अस्तित्व धोक्यात रात्रंदिवस वाहनांचा राबता : कारवाई होते पण वचक नाही

जत,संकेत टाइम्स : बोर नदीतही संख शहरातील पात्रासह ग्रामीण भागातील गावागावातील पात्रांमध्ये रात्रभर वाळू उपसा चालतो. नदीकाठच्या झाडाझुडपांमध्ये वाळूचे ढीग लावले जातात. त्यानंतर गाड्यांमध्ये भरून त्याची वाहतूक केली जाते. एकीकडे घरकुल योजनांसाठी वाळू ठेक्यांचा लिलाव देण्याचा विचार शासन करीत असताना शहरांमध्ये मोठमोठी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना वाळू येते कुठून असा प्रश्न पर्यावरणवादी उपस्थित करीत आहेत.दरम्यान संख अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीत‌ अधिकारी नसल्याने बोर नदी काठचा भाग ओरबडला ‌जात आहे.

बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलदेखील बुडतो आहे. वाळू उपशामुळे नद्यांचे पात्र खोल आणि रुंद झाले आहे. नैसर्गिक रचना बदलल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीच्या विरोधात महसूल विभाग कारवाई करीत आहे. जिल्हास्तरीय गाैण खनिज पथकाची कामगिरीही चांगली आहे. वाहने पकडून दंड ठोठावला जातो; परंतु वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू उपसा सुरूच आहे.




पात्र रुंदावल्याचा फटका

अनियंत्रित वाळू उपशामुळे बोर नदीचे पात्र अतिशय खोल आणि रुंद झाले आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळू नसल्याने नदीत पाणी थांबत नाही. शेतीसाठी आणि पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहणार नाही, तसेच तापीकाठच्या गावांना पुराचा फटका बसू शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे. प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी.