खड्डेमय रस्ते ठरताहेत ‘डोकेदुखी’

जत : शहरात विविध कामासाठी एकाचवेळी कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. मात्र, ठेकेदारांकडून रस्ते व्यवस्थित बुजविण्यात आलेले नसल्याने ओबडधोबड झाले आहेत. ग्रामीण भागात तर रस्त्याकडेची झाडी प्रचंड वाढली असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात संभवत आहेत. पावसामुळे रस्त्यावर शेवाळ येऊन रस्ते निसरडे झाले आहेत. रस्ते दुरूस्तीची जबाबदारी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागे लागून रस्ते दुरूस्ती, खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. जनतेच्या, वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने तो मार्गी लावणे आवश्यक आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे तरी हाती घेणे गरजेचे आहे.

वास्तविक कंपन्यांना खोदकामासाठी परवानगी देण्यापूर्वी काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजविण्याची अट घालणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने तसे होत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे खड्डयांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सुमार दर्जामुळे ‘खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे’ शोधावे लागत आहेत. काही ठिकाणी गटारांची उंची रस्त्यापेक्षा उंच असल्याने पाण्याचा निचराही लवकर होत नाही. त्यामुळे रस्त्यावर तलावाप्रमाणे पाणी साचत आहे. पाण्यातून खड्डयांचा अंदाज येत नसल्यानेच अपघात संभवत आहे. अपघातांना आमंत्रणे देण्यापेक्षा जनतेच्या हितार्थ प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:ची जबाबदारी घेत रस्ता दुरूस्तीची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. सतत दोन वर्ष कोरोनामुळे लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे दोन वर्षात दुरूस्ती रखडली मात्र त्याचा मनस्ताप जनतेला सोसावा लागत आहे. दोन वर्षात रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे.