जतेत गर्दी रोकण्यासाठी दोन लसीकरण केंद्रे | एक हजार डोस‌ उपलब्ध होणार

जत,संकेत टाइम्स : जत शहरात लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लसीकरण केंद्राची जागा बदलून एस.आर.व्ही.एम.
हायस्कूलमध्ये हालविण्यात आले आहे.तेथे पहिला,दुसरा डोस असे दोन ठिकाणी लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र लस घेण्यासाठी आलेल्या उत्साही तरूणांकडून पुन्हा सोशल डिस्टसिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहे. प्रशासन कोरोना पासून बचाव करण्यासाठी एकीकडे सर्व परीने प्रयत्न करत असताना नागरिकांचे त्यांना सहकार्य मिळत‌ नसल्याने कोरोना विरोधच्या लढाईत संकटाचा‌ सामना करावा लागत आहे.


जत शहरातील पुतळाराजे ग्रामीण रूग्णालयासमोरील स्व.किर्तिमालिनिराजे डफळे संकुलात आरोग्य विभागाच्यावतीने कालपर्यंत कोरोनाच्या  लस देण्यात येत होत्या.परंतु या ठिकाणी एकच मोठा हाॅल आहे.येथे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने संकुलातील ही जागा अडचणीची ठरत होत होती.अनेक वेळा गर्दी,गोंधळाची स्थिती निर्माण होत होती.या पार्श्वभूमीवर तहसिलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यानी कोरोना लसीकरणासाठी येथिल एस.आर.व्ही.एम.हायस्कूलची निवड करून शुक्रवार सकाळपासून या ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू केले 
आहे. नोंदणीचे कामकाज करण्यासाठी दोन  विभाग सुरू केले असून यामध्ये पूर्वी ज्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे.त्यांच्यासाठी दुसरी लस घेण्यासाठी एक विभाग व नव्याने लस घेणारे आठरा वर्षाच्या पुढील युवकांसाठी एक विभाग सुरू केला आहे. स्त्रियांसाठी ही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.लसीचे डोसही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.प्रशासन व आरोग्य विभागाने लसीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेतली असतानाही नागरिक मात्र मोठी गर्दी करून एकमेकांना खेटून ऊभे होते.त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेचे या ठिकाणी दिसून येत होते.


उपलब्ध लसीची माहिती प्रसिद्ध करावी

प्रशासनाने व आरोग्य विभागाने लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारा समोर एकूण उपलब्ध असलेल्या लसीची माहीती प्रसिद्ध करावी,लसीचा दुसरा डोस घेणारे व जेष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे.त्याशिवाय गर्दी होऊ नये,याबाबत उपाययोजना कराव्यात,अशी मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

जतसाठी एक हजार लसीचे डोस


एस.आर.व्ही.एम.हायस्कूल या ठिकाणी अजून दोन दिवस कोरोना लसीकरण केंद्र सुरू राहाणार असून जतसाठी जिल्हा परिषदेकडून आणखी एक हजार डोस उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी एकाच वेळी गर्दी करू नये,सर्वांना लस देण्याचे नियोजन आहे, असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.


जत शहरातील एसआरव्हीएम हायस्कूलमध्ये‌ सुरू झालेल्या केंद्रातही नागरिकांचा हालगर्जीपणा दिसून आला.