युरियाचा तुटवडा करून शेतकऱ्यांची लुट | नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कोमात ; ऐन हंगामात शेतकऱ्यांचे हाल

जत,संकेत टाइम्स : खरीप हंगामाच्या ऐन मध्यावर तालुक्यात युरियाचा कृषी केंद्रचालकांनी कृत्रिम तुटवडा केला आहे.त्यामुळे युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून युरियाचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


जत तालुक्यातील मुर्दाड व शेतकऱ्यांना लुटणाऱ्या काही कृषी दुकानात शासनाकडून युरिया आलेला असतानाही त्यांचा स्टॉक शासनाच्या साईटवर वेळेत टाकला जात नसल्याने शासनाकडून पुढील टप्यातील युरिया मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे.


दुसरीकडे तालुक्यातील काही गबरगंड दुकानदार जादा दराने युरिया विकण्यासाठी माहिती अपडेट करत नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.परिणामी युरियाचा तुटवडा करण्याला तालुक्यातील काही मोठे कृषी दुकानदार कारणीभूत ठरत आहेत. मोठ्या प्रमाणात युरियाचा त्यांच्याकडून साठा उचलला जात आहे. तो अगदी एक दोन दिवसात संपला म्हणून सांगत थेट लिंकिग करत शेतकऱ्यांची लुट केली जात आहे.परिणामी गत आठवड्यात तालुक्यातील काही बोटावर मोजण्या एवढ्या कृषी दुकानदारांनी थेट शेतकऱ्यांना युरियाची विक्री करत होते.


मात्र काहींनी आलेला युरियाची संकेत स्थळावर अपडेट माहिती न भरता युरियाचा बेकायदा साठा केल्याची समोर येत आहे. पुन्हा हाच युरिया पोत्यामागे 100 रूपयापर्यत दर वाढवून विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्याचे आरोप आहेत.

नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सक्षम करावी

दरम्यान कृषी दुकानांना युरियाचा पुरवठा करणारी तालुक्यातील यंत्रणा सक्षम करावी,जेणेकरून पुढील काही दिवसात युरियाचा पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा.साठा करणाऱ्या कृषी दुकानाची गोडावून तपासणी करावी अशी मागणी होत आहे.


माहित अपडेट करण्याचे आदेशाला हारताळ

जत तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी केली होती.त्यावर आमदार सांवत यांनी माहिती घेतली असता भयानक वास्तव समोर आले होते.तालुक्यातील कृषी दुकानदारांनी शासनाच्या पोर्टलवर युरिया विक्रीची माहिती अपडेट केली नसल्याने पुढील स्टॉकचा युरिया तालुक्याला मिळत नव्हता.त्यामुळे सावंत यांनी कृषी विभागाला कडक आदेश देत सर्व दुकाने तपासण्याच्या सुचना दिल्या होत्या.तरीही मुर्दाड कृषी दुकानातून शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे.