तासगाव कारखान्याचीही ईडीकडून चौकशी करा ; महेश खराडे

सांगली : राज्यभर गाजत असलेल्या साखर कारखाना विक्री घोटाळ्यात सांगली जिल्ह्यातील नागेवाडी,जत आणि निनाईदेवी या कारखान्याचा समावेश आहे,मात्र तासगाव कारखाना विक्री घोट्याळ्याचा समावेश नाही.त्यामुळे ईडीने तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.      


खराडे म्हणाले,इडीने राज्यात प्रथम जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली. यामुळे राज्यभरातील कारखाना विक्रीचा दरोडा उघडकीस आला आहे.पहिल्या टप्प्यात राज्यातील 42 कारखान्याच्या विक्रीची चौकशी होणार आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील यशवंत शुगर नागेवाडी, नीनाई देवी कोकरूड आणि विजयसिंह डफळे जत यांचा समावेश आहे.मात्र तासगाव सहकारी साखर कारखाना अवघ्या 34 कोटीला खा. संजयकाका पाटील यांनी विकत घेतला आहे.त्याचा यामध्ये समावेश नाही 27 हजार सभासदाच्या हा कारखाना होता. दीडशे एकर कारखान्याच्या मालकीची जमीन,मशिनरी याची विक्री केवळ 34 कोटीला करण्यात आली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँकेने मिळून हा घोटाळा करून सभासद, कामगार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.या प्रकरणी प्रा.एन.डी. पाटील यांनी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई केली,पण त्यात यश आले नाही.मात्र आता राज्यातील 42 कारखान्याचा विक्री घोटाळा उजेडात आला आहे.त्यामुळे तासगाव कारखाना विक्री घोटाळ्याची चौकशी होवून तो कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे,यासाठी माजी खा.राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील ईडी च्या कार्यालयात तक्रार करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाची रीतसर चौकशी होवून दोषिवर कारवाई व्हावी,यासाठी प्रयत्न करणार आहोत,असा इशारा खराडे यांनी दिला आहे.

चौकशीत केन अग्रोचा समावेश नाही

माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा केन अग्रो अर्थात डोंगराई कारखाना सहकारी होता,मात्र तो कारखाना खाजगी करण्यात आला.तो खाजगी कसा झाला सभासद शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले,मात्र याची कुठेच चर्चा नाही.हाही मोठा घोटाळा आहे,मात्र याचाही या 42 कारखान्याच्या यादीत समावेश नाही.त्यामुळे या प्रकरणी दाद मागणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.