सांगलीत 'लाचलुचपत'चा 'महावितरण'ला पुन्हा 'शॉक'

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथील दोन कंत्राटी वायरमनना लाच घेताना जेरबंद केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणला जबरदस्त 'शॉक' दिला आहे. सांगलीत तक्रारदार यांच्या राहत्या जागेतील विद्युत पोल काढून देण्यासाठी 5500 लाच घेणाऱ्या मयूर जयवंत साळुंखे या लाईनमनला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महावितरणमधील सलग दोन 'ट्रॅप'मुळे खळबळ उडाली आहे.

      

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या राहत्या जागेत विद्युत पोल आहे. हा पोल काढण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार यांनी लाईनमन मयूर साळुंखे यांच्याकडे केली होती. या कामासाठी साळुंखे यांनी 16 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 10 हजार रुपयांची लाच प्रथम स्वीकारली होती. उर्वरित 6 हजार रुपयांची मागणी ते करीत होते.

      
याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज 5 जुलै रोजी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आज या विभागाने पडताळणी केली. पडताळणीत साळुंखे यांनी 6 हजार लाचेची मागणी करून 5500 ला सौदा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदाराच्या राहत्या घराजवळ पोल काढण्याचे काम सुरू होते त्याठिकाणी सापळा लावला होता. यावेळी मयूर साळुंखे यांनी तक्रारदार यांच्याकडून 5500 लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी त्याठिकाणी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साळुंखे याच्यावर झडप घातली.