उमदी आत्महत्या प्रकरण,दोघा सावकारावर गुन्हा दाखल

जत,संकेत टाइम्स : उमदी(ता.जत) येथे खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून रमेश मारुती शेवाळे वय (45) या शेतकऱ्यांने दिनांक 2 जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मंगळवेढा येथील नंदकुमार श्रीनिवास पवार (वय 45) व संतोष खटकाळे (वय 40) दोघे रा.आसबेवाडी ता.मंगळवेढा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,उमदी येथील रमेश मारुती शेवाळे या शेतकऱ्यांने सन 2014 साली आपल्या वडीलांच्या नावे असलेली जमीन (सर्वे 84/1) ही मंगळवेढा येथील नंदकुमार श्रीनिवास पवार व आसबेवाडी येथील संतोष खटकाळे यांना लिहून देऊन 4 टक्के व्याजाने 3 लाख रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात त्यांना व्याजाचे 8 लाख रुपये परत दिले होते. मात्र पैसे देऊन ही या दोन्ही सावकारांनी रमेश यास वारंवार फोन करून शिविगाळ करत तसेच अपमानास्पद वागणूक देत आणखीन पैशाची मागणी करत होते.तसेच त्यांच्या तगाद्या व दमदाटी मुळे मानसिक दबावातून रमेश यांनी आत्महत्या केली असल्याचे रमेशचे वडील मारुती शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे.


याप्रकरणी उमदी पोलिसांनी नंदकुमार पवार व संतोष खटकाळे यांना अटक करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 39,45,306,34 या कलमा अतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव दांडगे करीत आहेत.