इतर तालुक्याच्या रुग्णसंख्येची शिक्षा अन्य तालुक्यांना का? ; विक्रम ढोणे यांचा सवाल | पालकमंत्र्यांनी सर्वसमावेशक निर्णय घ्यावा

जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एप्रिल महिन्यापासून टप्याटप्याने लॉकडाऊन केले जात आहे.जिल्ह्याचा  रुग्ण संख्येवरून पॉजिटीव्हीटी रेट काढला जात आहे.या पॉजिटीव्हीटी रेटवरून लॉकडाऊन सरसकट केले जात आहे.वास्तविक हे अत्यंत चुकीचे आहे.यामुळे शेतकरी, व्यापारी, हातावरचे पोट असणारे आदी अनेकांचे हाल होत आहेत.तालुका नुसार रुग्णसंख्या विचारात घेऊन कोरोणाचे निर्बंध त्या त्या तालुक्यासाठी मर्यादित करावेत.इतर तालुक्याच्या वाढत्या रुग्णसंख्येची शिक्षा अन्य तालुक्याला कशासाठी? असा सवाल युवक नेते विक्रम ढोणे यांनी करत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सर्वसमावेशक निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.
        


विक्रम ढोणे म्हणाले की,एकीकडे रुग्णसंख्या सर्वाधिक वाळवा तालुक्यात ,त्यानंतर काही प्रमाणात मिरज,सांगली,तासगाव,खानापूर, कडेगाव ,शिराळा अशी वाढत आहे.तर जत,आटपाडी,कवठेमहांकाळ या तालुक्यात रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे.तालुक्याच्या तहसीलदारांना  आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकार आहेत.त्यामुळे जिल्हयात ज्या तालुक्यात रुग्णसंख्या वाढेल,त्या तालुक्यासाठी किंवा गावासाठी तहसीलदार योग्य ते निर्णय घेऊ शकतात,असे असताना जिल्ह्यातील कोरोणाच्या एकूण रुग्णसंख्येच्या आधारावर लॉकडाऊनची मुदत सातत्याने वाढवणे हे कितपत योग्य आहे?
      

जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील काही गावात रुग्णसंख्या खूपच कमी आहे.मात्र या गावांना जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा फटका बसत आहे.एकीकडे केंद्रशासन,राज्यशासन अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे.मात्र या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे,व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला लॉकडाऊनमुळे दर मिळत नसल्याचे चित्र आहे.शेतकरी चिंतेत आहे.दोन हजार ते 50 हजार रुपये दुकानाचे भाडे व व्यापारासाठी  बँकेकडून काढलेल्या कर्जाचे  हप्ते याची चिंता अनेक व्यापाऱ्यांना सतावत आहे.त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक निर्णय घेणे आवश्यक आहे.