प्रशासन,दुकानदारांनी केली खत‌ टंचाई,शेतकऱ्यांसमोर नवे संकट

जत,संकेत टाइम्स : खत टंचाईचे शेतकऱ्यांसमोर नवे संकट
पेरण्या उरकल्यानंतर वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना खत दिले जाते. जून महिन्यात झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. आतापर्यंत 100 टक्केवर पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिके अंकुरली आहेत. त्यातच पाऊस गायब झाल्याने पिके कोमेजून जात होती,मात्र मंगळवार पासून सुरू झालेल्या पावसाने या पिकांना तारले आहे.या पिकांना तग धरुन ठेवण्यासाठी खते दिलीे जात आहेत. त्यामुळेच खताला मागणी वाढल्याने बाजारपेठेत खताची टंचाई निर्माण करण्यात आली आहे.जत तालुक्यातील जतसह विविध गावातील बाजारपेठेत युरिया, डीएपी या खतांना मागणी आहे. मात्र खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे खत टंचाईमुळे शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत.

सद्यस्थितीला बाजारपेठेत युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी युरिया खत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या खताची कृत्रिम साठेबाजी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कडक भूमिका घेणे गरजेचे असताना याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची लूट होत आहे.


मागणी वाढली अन्‌ खत गायब

जिल्ह्यात युरिया खताची मागणी वाढत असतानाच बाजारपेठेतून हे खत गायब झाले आहे. विशेष म्हणजे इतर खते उपलब्ध असताना युरियाचीच टंचाई कशी झाली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. निर्माण झालेल्या टंचाईचा काहींनी लाभ उठवत चढ्या दराने खत विक्रीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता वाढली आहे.


भावफलक लावण्यास टाळाटाळ

प्रत्येक कृषी विक्रेत्याला त्याच्या दुकानासमोर उपलब्ध असलेल्या कृषी निविष्ठांचा भावफलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती देण्याचेही बंधनकारक केले आहे. मात्र जत बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी भावफलक लावण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे खते, बियाणे किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना होत नाही.


प्रशासनाच्या नोंदीनुसार तालुक्यातील अनेक गावात युरिया,डीएपी,एमओपी,
एनपीके खताची शिल्लक साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील मुर्दाड कृषी दुकानदाराकडून खताचे लिंकिग करून शेतकऱ्यांना छळण्याचा उद्योग सुरू आहे. याकडे संबधित यंत्रणांनी गंभीरपणे लक्ष द्यावे,अशी मागणी होत आहे.