डाॅक्टरांना पैसे मागताय ; ऊसबीले कोण देणार? | खा. संजय पाटील यांना अजितराव घोरपडेंचा सवाल

तासगाव : तासगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवहेलना सुरु आहे. एका बाजूला तुम्ही कोरोनावरील उपचाराचे जादा घेतलेले पैसे डॉक्टरांकडे परत मागत आहात. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांनी कारखान्यास पुरवठा केलेल्या ऊसाचे पैसे देत नाही आहात. हे पैसे शेतकऱ्यांना कोण देणार, असा खडा सवाल माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांनी खासदार संजय पाटील यांना नाव न घेता विचारला आहे. सावर्डे ग्रामपंचायतीत आयोजित केलेल्या शिवसेनेच्या नूतन पदाधिका-यांच्या सत्कार प्रसंगी घोरपडे बोलत होते. 
       
       
यावेळी घोरपडे म्हणाले, तासगाव तालुक्यातील नेत्यांनी खोटं बोलून राजकारण करण्याची परंपरा सुरु केलेली आहे. यापुढील काळात परंपरा मोडून काढायला पाहिजे. तसेच तालुक्यातील लोकांना भविष्यात नितीवान राजकारण कसं करायचं शिकवण्याची गरज आहे.

       
शिवसेनेचे उपनेते, सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे - पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील काही गावामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. परंतू स्थानिक आमदार या गावामध्ये निधी देताना दुजाभाव करतात. अशा तक्रारी कार्यकर्ते करत आहेत. यापुढील काळात अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. सावर्डे ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेला 9 लाखांचा आमदार फंड मिळाला नसला तरी चिंता करायचे कारण नाही. यापुढील काळात 9 नव्हे तर गावाला 90 लाख फंड मिळवून देऊ.
       
     
जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, तासगाव तालुक्यातील आमदार -  खासदारांचे सेटलमेंटचे राजकारण मोडून काढण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे.