नगरपंचायतीत सोनेरी टोळी सक्रीय | या नेत्याने केली चौकशीची मागणी

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरात विकासकामे करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा मलिदा खाणारी सोनेरी टोळी नगरपंचायतीत सक्रीय झालेली आहे.सोनेरी टोळीने प्रशासनाला हाताशी धरुन शहरातील बंदिस्त गटारीच्या 30 लाख रुपयांच्या कामासाठी 1 कोटी 14 लाख रुपयांचा निविधा मंजूर करुन ठेका दिला आहे, असा घणाघाती आरोप भाजप नेते हायुम सावनूरकर यांनी केला आहे.
यातून लाखो रुपयांवर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेल्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी शहरातील नागरिकांना घेऊन लढा उभा करणार आहे. त्यांचा बंदोबस्त करुन गोरगरीबांचा लाखो रुपये हडप करण्याचा डाव उधळून लावू, असा इशारा हायूम सावनूरकर यांनी दिला आहे.हायूम सावनूरकर म्हणाले, नगरपंचायतीमधील काही नगरसेवकच या टोळीचे सभासद आहेत.प्रशासनाची दिशाभूल करुन या टोळीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे शहरातील लोकसंख्येची खोटी माहिती सादर केली. यामुळे या गटारीच्या कामासाठी एक फूट व्यासाच्या पाईपलाईनला मान्यता मिळाली.