जतेतील गर्दी कोरोनाला निमंत्रण | कोन करणार अंमलबजावणी ; रुग्ण संख्येत वाढ

जत,संकेत टाइम्स : कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले असून हाॅस्पीटल, मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद करण्याचे व ग्राहकांना घरपोच सेवा पुरविण्याचे आदेश दिले असतानाही जतमध्ये मात्र जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सर्वच अस्थापना सुरू राहील्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.परिणामी अशा गर्दीमुळे पुन्हा शहरात बुधवारी रुग्ण संख्या वाढली आहे.


जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्याऐवजी यामध्ये दिवसेंदिवस चढउतार पहावयास मिळत असल्याने जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक आदेश हे दिनांक 19 जुलैपर्यंत वाढविले असून जिल्ह्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या आटोक्यात येण्यासाठी बुधवार पासून त्यानी कठोर निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी बुधवार पासून लागू केलेल्या निर्बंधांमध्ये  रस्त्यावरील सर्व साहित्य विक्री बंद,रस्त्यावरील सर्व भाजी व फळ विक्री बंद,मास्क नसल्यास दुकानदाराला पाचशे रूपये दंड,वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान सिल,


नियमांचे पालन करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीसांची तसेच नियम मोडणारेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सबंधितांना दिले असताना जत शहरात मात्र स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत होती.


शहरातील प्रमुख बाजारपेठेत स्टेट बॅंकेसमोर तसेच जयहिंद चौक ते मटनमार्केट या रस्त्यावर रस्त्याचे दोन्ही बाजूला भाजी विक्रेते हे बसून व्यवसाय करित होते.तर फळविक्रेते ही रस्त्याचे दोन्ही बाजूला आपले हातगाडे उभे करून फळविक्री करताना दिसत होते.काही दुकानापुढे ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत होती.दुकानदार व ग्राहक यांच्याकडून कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नव्हते.प्रशासनाच्या माहिती प्रमाणे जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे लसीकरण अल्प प्रमाणात झाले आहे.अशा ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना दिले असतानाही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने  जत कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याशिवाय राहणार नाही  यासाठी सबंधितांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी जत शहरवासियातून करण्यात येत आहे.


जत शहरात अशी गर्दी कोरोनाला निमंत्रण देत आहे.