बस्तवडेतील आत्महत्येचा प्रयत्न खासगी सावकारीतून? | युवकाची मृत्यूशी झुंज सुरू : पैशासाठी खानापुरात सावकाराने दिली होती धमकी

तासगाव : तालुक्यातील बस्तवडे येथील एका 32 वर्षीय युवकाने काल (शनिवारी) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पवार नामक खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून पीडित युवकाने हे पाऊल उचलल्याची गावात चर्चा आहे. या सावकाराने काल खानापूर येथे सबंधित युवकाला पैशासाठी धमकी दिली होती. याठिकाणी दोघांमध्ये जोरदार वादही झाला होता. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहेत.

      

याबाबत माहिती अशी, सबंधित पीडित युवक करंजे (ता. खानापूर) येथील ग्रामीण रुग्णालयात शिपाई म्हणून काम करतो. अतिशय कष्टातून त्याने तीन एकर द्राक्षबाग लावली आहे. शेतीत प्रगती करताना आर्थिक गणित कोलमडल्याने त्याने अंदाजे अडीच एकर जमीन गावातील एका पवार नामक खासगी सावकाराकडे गहाण ठेवली आहे. मुदतखरेदीच्या नावाखाली ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न हा खासगी सावकार करीत आहे. दोघांमधील व्यवहाराची मुदत संपायला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र व्याजाला चटावलेला सबंधित नराधम सावकार सतत 'त्या' पीडित युवकाला व त्याच्या घरच्यांना त्रास देत होता. यातून अनेकवेळा बाचाबाचीही होत होती.

     

काल सकाळीही पीडित युवकाचा भाऊ आणि सबंधित सावकारामध्ये व्याजाच्या पैशावरून वादावादी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, काल दुपारी सबंधित युवक त्याच्या कामासाठी खानापूरला गेला होता. त्याठिकाणी व्याजाच्या पैशासाठी पिळवणूक करणारा सावकाराची व या युवकाची भेट झाली. यावेळी सावकाराने त्या युवकाला व्याजाच्या पैशावरून शिवीगाळ केली. यातून दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे बोलले जात आहे.

      

सबंधित खासगी सावकाराकडून सतत पैशासाठी तगादा व वादावादीमुळे हा युवक नैराश्येत होता. वैतागून जाऊन त्याने काल मद्यपान केले. मात्र गावातील काही मित्रांनी रात्री घरी जाऊन त्याची समजूत काढली होती. सबंधित सावकाराचे पैसे परत देऊन जमीन फिरवून घेण्याचीही चर्चा झाली होती. या युवकाची समजूत काढून मित्र घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्याने गळफास घेतला. हे समजताच त्याचे मित्र त्याठिकाणी धावून गेले. घराचे दार मोडून फासावर लटकलेल्या या युवकाला खाली काढण्यात आले.

     

त्यानंतर तातडीने त्याला तासगाव येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र एकाही खासगी दवाखान्यात त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यामुळे तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. सध्या हा युवक मृत्यूशी झुंज देत आहे.

      

दरम्यान, पीडित युवकाच्या घरचे व इतर नातेवाईक मुजोर सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा तयारीत आहेत. या सावकाराने गावात उच्छाद मांडला आहे. गावातील गोरगरिबांच्या मुंड्या मुरगाळून त्याने अनेकांना देशोधडीला लावले आहे. अनेकांच्या जमिनी लिहून घेऊन या सावकाराने व्याजाच्या धंद्याचा बाजार थाटला आहे. 5 टक्क्यापासून 20 टक्क्यांपर्यंत व्याजाने पैसे देऊन गोरगरिबांची घरे लुटली जात आहेत. गरजूंना लुटून गबरगंड झालेल्या या सावकाराच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या जाचाला कंटाळून एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे.