रुग्ण वाढले,शासकीय रुग्णालय बंदचं | भाजपाचा आंदोलनाचा इशारा ; 28 बेडच्या एकाच रुग्णालयावर तालुक्याचा भार

जत,संकेत टाइम्स : जत शहरात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेले 70 बेडचे ऑक्सीजन युक्त कोविड रुग्णालय रुग्ण संख्या वाढत असतानाही बंद ठेवण्यात आल्याने रुग्णाची ससेहोलपट होत आहे, त्यामुळे जतेतील हे बंद रुग्णालय तातडीने सुरू करावे,अशी मागणी महिला बालकल्याण सभापती सुनिता पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोठा गाजावाजा व प्रतिष्ठेने जतेत सुरू झालेले 70 खाटाचे शासकीय कोविड रुग्णालय बंद केल्याने जत तालुक्यातील गरिब कोरोना रुग्ण उपचारा अभावी मुत्यूला कवटाळत आहेत.तर दुसरीकडे खाजगी उपचारासाठी लाखो रुपयाचा भुर्दड नागरिकावर पडत आहे.जत तालुक्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे, दररोज 50-60 नवे रुग्ण आढळून येत आहेत.त्या प्रमाणात जतेत फक्त 28 खाटाचे एकच शासकीय रुग्णालय सुरू आहे. तर एक खाजगी असे दोन कोविड रुग्णालये जत तालुक्यात सुरू आहेत.तालुक्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.त्यामुळे दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी सांगली,मिरज येथे जावे लागत आहे.
तेथे उपचारासाठी लाखो रुपयाचा भुर्दड अगोदरच गेल्या दोन वर्षापासून जगण्यासाठी झगडणाऱ्या सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. या पैशासाठी जमिनी,प्लॉट,घरे,सोन्याचे दागिणे विकण्याची वेळ नागरिकावर आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाला याचे गांर्भिर्य नसल्याने रुग्ण संख्या वाढूनही बंद शासकीय रुग्णालय अद्याप चालू करण्यात आलेले नाही.दरम्यान जतेतील हे रुग्णालय चालू करण्यासाठी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 29 जूलैला जत तहसील कार्यालयासमोर बोबाबोंब आंदोलन करणार असल्याचेही सौ.पवार यांनी सांगितले.


743 रुग्ण उपचाराखाली

जत तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा उद्रेक सुरू केला आहे. तालुक्यात दररोज 50 च्या वर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. बुधवार अखेरपर्यत तालुक्यात तब्बल 743 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यांच्या उपचारासाठी फक्त 28 बेडचे‌ एकच शासकीय रुग्णालय सुरू आहे,हे तालुक्याचे दुर्देव्य आहे.

रुग्णांना खाजगीत उपचार घेण्याची वेळ

तालुक्यात सातत्याने अनेक रुग्णाची प्रकृत्ती खालावत आहे.त्यांना जत तालुक्यात शासकीय रुग्णालय नसल्याने महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे.त्यामुळे आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.