20 जुलै रोजी 'स्वाभिमानी'चे खासदारांच्या कार्यालयासमोर तर 'बळीराजा'चे खासदारांच्या घरासमोर आंदोलन

तासगाव : ऊसाचे गाळप होऊन सहा - सहा महिने होत आले तरी खासदार संजय पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. अनेकवेळा आंदोलने करूनही खासदारांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 जुलै रोजी खासदारांच्या तासगावातील संपर्क कार्यालयासमोर तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने खासदारांच्या चिंचणी येथील घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर स्वाभिमानीच्या वतीने तर खासदारांच्या नावाने शहरात भीक मागून आंदोलक आपली गुजराण करणार आहेत.

      

सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील हे तासगाव आणि नागेवाडी साखर कारखाना चालवतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस पाठवला. मात्र 15 जानेवारीनंतर गाळप झालेल्या दोन्ही कारखान्याची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाहीत.

      

या बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीनवेळा आंदोलने केली आहेत. मात्र प्रत्येकवेळी खासदार पाटील यांच्याकडून आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले. आश्वासने आणि तारखा देऊन शेतकऱ्यांना गंडवण्यात आले. शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडवणार नाही, असले भावनिक स्टेटमेंट खासदारांनी केले. मात्र यातील एकही शब्द खासदारांनी पाळला नाही. परिणामी दोन्ही कारखान्याचे अन्यायग्रस्त शेतकरी चिडीला पेटले.


त्यामुळे 21 जून रोजी स्वाभिमानीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. तत्पूर्वी कारखान्याचे व्यवस्थापक आर. डी. पाटील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीतील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नावाने काढलेले चेक दाखवले. तर खासदारांनी 21 जून पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करू, अशी ग्वाही दिली. मात्र आजतागायत शेतकऱ्यांना घामाचे पैसे मिळाले नाहीत. प्रत्येकवेळी खासदारांकडून कष्टकरी शेतकऱ्यांना गंडवण्याचे काम सुरू आहे.

      

खासदारांच्या खोटारडेपणामुळे आता स्वाभिमानी व बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या दोन्ही संघटना आता शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी मैदानात उतरल्या आहेत. जोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या घामाचे दाम मिळत नाहीत तोपर्यंत आता मागे हटणार नाही, अशी भूमिका दोन्ही संघटनांनी घेतली आहे. 

      
त्यासाठी स्वाभिमानाच्यावतीने 20 जुलै रोजी खासदारांच्या तासगाव येथील जनसंपर्क कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत बिले मिळत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार या संघटनेने केला आहे. आंदोलन काळात संघटनेचे कार्यकर्ते तासगाव शहरातून खासदारांच्या नावाने भीक मागून आपली गुजराण करणार आहेत. तर दुसरीकडे याच दिवशी बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खासदारांच्या चिंचणी येथील घरासमोर ठिय्या मारणार आहेत. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नाहीत तोवर माघार नाही, असा इरादा याही संघटनेने केला आहे. त्यामुळे ऊस बिलावरून ऐन पावसाळ्यात खासदारांच्या विरोधात आंदोलनाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.आर. आर. सी. अंतर्गत कोणती कारवाई केली याचा जाब तहसीलदारांना विचारणार : खराडे

       उसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसात बिले देण्याचा कायदा आहे. मात्र तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने सहा - सहा महिने शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. त्यामुळे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे तक्रारी झाल्या आहेत. गायकवाड यांनी आर. आर. सी. अंतर्गत दोन्ही कारखान्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना बिले द्या, असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहेत. चौधरी यांनी या आदेशाची अंमलबजावणी करायचे आदेश तासगाव आणि विट्याच्या तहसीलदारांना दिले आहेत. मात्र तरीदेखील अद्याप शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे आर. आर. सी. अंतर्गत नेमकी कोणती कारवाई केली, याचा जाबही तहसीलदारांना विचाणार आहे, अशी माहिती महेश खराडे यांनी दिली.