कोरोनाचा चढउतार वाढवतोय तालुक्याची धाकधूक | रुग्ण घटले,पण संसर्ग सुरूच | एक-दोन दिवसाआड होतेय मृत्यूची नोंद

जत,संकेत टाइम्स : गेल्या पंधरवड्यापासून जत‌ तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली आहे. मात्र कोरोना संपलेला नाही. उलट संख्या कमी असली, तरी रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात चढउतार नोंदविला जात आहे. त्यामुळे थाेडेसेही दुर्लक्ष अंगलट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जून महिन्याच्या प्रारंभापासूनच रुग्णवाढ रोडावली आहे. परंतु, संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. दररोज वीस ते पंचवीस रुग्ण आढळत आहेत. तर एक-दोन दिवसाआड एखाद्या रुग्णाचा मृत्यूही नोंदविला जात आहे. जिल्ह्यात 7 जूनपासून संपूर्ण अनलाॅक करण्यात आले आहे. सर्व व्यवहार निर्बंधांशिवाय सुरळीत सुरू आहेत. परंतु, रुग्ण आढळण्याचा रतीब कमी झाला तरी कायम आहे. रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण काहीअंंशी कायम आहे. मात्र एक-दोन दिवसाआड हे दोन्ही आकडे वाढताना-उतरताना दिसत आहेत.


सध्या आपल्याकडे कोरोनाचे नगण्य रुग्ण आहे. जे रुग्ण ॲडमिट आहे, त्यांना पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याशिवाय आपण घरी पाठवतच नाही. कोरोना संसर्गाचा चढउतार आपण यापूर्वीही पाहिला आहे. त्यामुळे सध्या रुग्ण कमी झाले असले तरी सर्वांनी शंभर टक्के लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची त्रिसूत्रीही पाळली पाहिजे.

- डाॅ.संजय बंडगर
तालुका वैद्यकीय अधिकारी