जत तालुक्यातील ग्रामीण भागाचा स्तर उंचवेना

जत : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर कमी होत नसल्यामुळे स्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार आहेत. स्तर उंचावत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लॉकडाऊन सध्या ‘जैसे थे’ आहे.जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रियपणे राबविण्याच्या सूचना एका बैठकीत दिल्या.ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण कमी करून शहराप्रमाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागही स्तर एकमध्ये आणण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणाऱ्यांसह सर्वांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून ग्रामीणचा बाधित दर कमी होण्यास मदत होईल. ब्रेक दी चेन अंतर्गत सध्या शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांव्यतिरिक्त सर्व बाबी खुल्या केल्या आहेत.

यापुढे 100 टक्के चाचणी करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांचा गौरव करावा. लस घेतलेल्यांना चाचण्यांमधून सूट द्यावी. लस घेतलेल्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करणे बंधनकारक आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भाग स्तर तीनमधून स्तर एकमध्ये आणता येईल. या उद्देशाने सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केेले.