तालुकाभर अवैध दारू तस्करांना परवाना धारकांकडूून दारूचा पुरवठा

जत : तालुक्यात अवैध दारू तस्करी व अवैध दारू विक्री पूर्णतः बंद करून संबंधित यंत्रणेला निर्देशित करून त्वरित उपाययोजना करण्याबाबत सुचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.तालुक्यातील पोलीस ठाण्यांअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावागावांत अवैध दारू तस्करी व विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे गावागावात गुंडगिरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांनी जर अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध आवाज उठवला तर दारू तस्कर गुंडगिरी करून शस्त्राचा धाक दाखवून मारपीट करण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. 


गल्लीगल्लीत राजरोसपणे दारू विक्रेत्यांना दारू तस्कर घरपोच दारू पोहोचवित आहेत. ही दारू जत,उमदी ठाणे हद्दीतील सर्वच छोट्या मोठ्या गावात पोहोचत आहे. प्रत्येक गावात अवैध दारू सहज उपलब्ध झाल्याने दारुच्या व्यसनात मोठी वाढ झालेली दिसून येते.
त्याचा वाईट परिणाम लहान मुलांच्या भविष्यावर व महिलांवर होत आहे. अवैध दारू विक्री व तस्करीच्या व्यवसायातून गुन्हेगारीचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे.मात्र, त्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही न केल्याने पोलीस प्रशासनाविरुद्ध सामान्य जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे.
पोलिसांतर्फे कोणतीही कारवाई केली नसल्याने जाणीवपूर्वक दारू तस्करांचे धाडस वाढलेले आहे. या अवैध दारू तस्करी व विक्रीवर कायमस्वरूपी आळा घालण्याकरिता ठाणेदार यांना विनंती केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नाही. या सर्व प्रकाराला त्यांचे अभय असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


अवैध दारू तस्करांना परवाना धारकांकडूून दारूचा पुरवठा

जत तालुक्यातील जत,संख,डफळापूर, उमदी,बिळूर,शेगाव या भागातील परवाना धारक दारू विक्रेत्यांकडून नियम डावलून अशा गावागावातील दारू तस्करांना दारूचा पुरवठा होत आहे.तेथील दारू हे तस्कर दुप्पट दराने गावागावात विकतात.यामुळे गावांची शांतता भंग झाली आहे. त्यामुळे परवाना धारक दुकानांची तपासणी उत्पादन शुल्क व पोलीसांनी काटेकोरपणे करावी.