कोरोना काळात हॉस्पिटल्सनी लुटले असल्यास तक्रारी द्या | खासदार संजय पाटील यांचे आवाहन | लोकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन | तक्रारी या संकेतस्थळावर करा..


तासगाव : कोरोना आला त्यावेळी तो आजार होता. आता तो बाजार झाला आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमधून रुग्णांना लुटण्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या संकेतस्थळावर तक्रारी कराव्यात. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी त्यांनी एका संकेतस्थळाचीही निर्मिती केली आहे.

     
याबाबत खासदार संजय पाटील म्हणाले, गेल्या दीड वर्षात सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. या महामारीच्या तडाख्यात अनेक रुग्ण दगावले. ज्या रूग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले त्यापैकी अनेक हॉस्पिटलमध्ये त्यांची लूट करण्यात आली. रुग्णांकडून बेसुमार पैसे उकळण्यात आले. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा ज्यादा बिले आकारून रुग्णांच्या मुंड्या मुरगाळण्यात आल्या. 

      
रुग्णांकडून अवाढव्य रक्कम घेतल्यानंतर त्यांना या दवाखान्यातून लेखी बिलही दिले नाही. नागरिकांनीही आपला रुग्ण बरा होईल या आशेने रुग्णालय प्रशासन मागेल इतके पैसे दिले. त्याचाच गैरफायदा घेऊन जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ओरबडून त्यांची आर्थिक लूट करण्यात आली. 

     
याप्रकरणी आता खासदार संजय पाटील यांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या रुग्णांची अथवा नातेवाईकांची दवाखान्यांच्या बिलाबाबत तक्रार आहे त्यांनी माझ्या संकेतस्थळावर तक्रारी नोंदवाव्यात. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी http://sanjaykaka.org/covid19billissues/ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.