आजपासून विविध मागण्यासाठी आशा कर्मचारी बेमुदत संपावर

सांगली : आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 15 जून 2021 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सिटू इतर विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वे चे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. 


आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर  होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे. 

सांगली जिल्ह्यातील आशांनी एकत्र येत या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन आज जिल्ह्यातील प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या नेत्या मिना कोळी, सुरेखा जाधव,अंजू नदाफ, दिपाली होरे ,शबाना आगा लता जाधव, अनुपमा गौंड,कॉ हणमंत कोळी जिल्हा संघटक यांच्यासह मोठ्या संख्येने आशा  व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. 
किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख,जिल्हा सेक्रेटरी दिंगबर कांबळे यांनी पाठिंबा जाहीर केला.

डफळापूर : आजपासून आशा संपावर जाणार असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांना निवेदन देण्यात आले.