तासगावातील खासदारांच्या कार्यालयावरील उद्याचा मोर्चा रद्द | ‘स्वाभिमानी’चा निर्णय : तासगाव, नागेवाडी कारखान्याची बिले देण्यास सुरुवात

0



तासगाव : तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांनी उद्यापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात बिले वर्ग होतील, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या त्यांच्या कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. मात्र, खासदारांनी ‘शब्द’ न पाळल्यास पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा खराडे यांनी दिला आहे.


      




तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांनी जानेवारीपासून शेतकऱ्यांची बिले थकवली होती. ही बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोनवेळा मोर्चे काढले. मात्र खासदारांनी आश्वासने देऊन हे मोर्चे परतवले होते. परंतु त्यांनी आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे खासदार पाटील यांच्या तासगावातील कार्यालयावर उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता.


     


Rate Card



तत्पूर्वी काल खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली. शिवाय शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडवणार नाही. येत्या 15 दिवसात सर्वांची बिले देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज सांगली येथील शासकीय विश्रामगृहात कारखान्याचे व्यवस्थापक आर. डी. पाटील व शेतकरी संघटनेची बैठक झाली. बैठकीत पाटील यांनी उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले वर्ग करत असल्याची खात्री दिली. शिवाय तयार केलेले चेकही बैठकीत दाखवले. तसेच खासदार पाटील यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी खासदारांनी उद्यापासून बिले देण्यास सुरुवात करून येत्या 15 दिवसात सर्व शेतकऱ्यांचा विषय संपवतो, अशी ग्वाही दिली.


      




त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्याचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र जर खासदारांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही तर पुन्हा मोर्चा काढू, असा इशारा यावेळी देण्यात आला. बैठकीस महेश खराडे, संजय बेले, जोतिरामजाधव, अशोक खाडे, दामाजी डुबल, संदीप शिरोटे, नागेश मोहिते, मानसिंग जाधव उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.