...तर जिल्हा परिषदेला टाळे ठोकू ; संजय कांबळे | कोरोना लसीबाबत दुष्काळी जनतेची थट्टा

जत,संकेत‌ टाइम्स : कोरोनाने जत तालुक्यात 252 नागरिकांचा मुत्यू झाला आहे, मोठा उद्रेक कोरोनाने तालुक्यात केला आहे. अशा स्थितीत पुढील धोका टाळण्यासाठी संजीवनी ठरलेल्या कोरोना लसीचा अवश्यकतेनुसार पुरवठा करण्याऐवजी मी काय करू असे म्हणून दुष्काळी जनतेची थट्टा करणारे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी डाॅ.विवेक पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत,परिस्थिती बदलली नाहीतर सांगली जिल्हा परिषदेला टाळे ठोकू असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 


कांबळे म्हणाले की, जत तालुका हा कर्नाटक राज्याच्या सिमेलगतचा कायम दुष्काळी तालुका आहे.या तालुक्यातील चाळीस टक्के लोक हे उसतोडणी व अन्य उद्योगासाठी अन्य राज्यात जातात.तालुक्यातील बहुतांशी जनता अशिक्षीत आहे.त्याचाच गैरफायदा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घेत आहेत असा आरोप कांबळे यांनी केला आहे.


जत तालुक्यातील जनतेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मनात तिरस्काराची भावना आहे.त्यामुळेच त्यांनी कोरोना काळात ही जत तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचे पार्श्वभूमीवर जत तालुक्यात डुडी यांनी प्रशासकिय पातळीवर किती बैठका घेतल्या हे त्यानी जाहीर करावे,असे आवाहन करित पंचायत समितीचे सभागृहात एका बैठकीत डुडी यांना विचारण्यात आले होते.


त्या बैठकितच त्यांनी जत तालुक्यात कोरोना गंभीरपणे घेण्याची गरज नाही.जत तालुक्यात कुठे कोरोना आहे असे वक्तव्य करून दुष्काळी जनतेची एक प्रकारे थट्टा केली होती.
जत येथिल स्व.श्रीमंत किर्तिमालिनिराजे डफळे संकुलामध्ये जत ग्रामीण रूग्णालयाचे लसीकरण सेंटर आहे.परंतु येथिल आरोग्य विभाग व जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हापरिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये समन्वय नसल्याने आरोग्य विभागाकडे कोरोना लसीचा किती पुरवठा करण्यात आला हे जनतेला समजून येत नाही.परिणामी दिवसभर मोठ्या संख्येने नागरिक लस घेण्यासाठी ताटकळत उभे असतात.


शनिवारी असाच प्रकार घडला,दोन तासाहून लसीकरण केंद्र कुलूप बंद होते,तर समोर सुमारे दोनशे नागरिक लस घेण्यासाठी उपस्थित होते.
समोरून जात असलेले संजय कांबळे यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी  ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.मोहीते यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला असता डाॅ. मोहीते हे गावी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी प्रथम मी काय करू असे उध्दट उत्तर कांबळे यांना दिले, तुमच्या तालुक्यात लस घेण्याबाबत लोक गंभीर नाहीत,ते सहकार्य करित नाहीत असे आरोप केले.


त्यानंतर कांबळे यांनी जिल्हा वैद्यकिय अधिकारी डाॅ.विवेक पाटील यांच्याशीही संपर्क साधला, त्यांनी आमच्याकडे लस उपलब्ध नाही असे उत्तर देत जबाबदारी झटकली.या सर्व प्रकारात जत तालुक्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमेत घरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी लस उपलब्ध करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करू,असे आश्वासन दिले.


मुख्य कार्यकारी अधिकारी डुडीचा निषेध

जत सारख्या अशिक्षित व दुर्लक्षित तालुक्यात कोरोनाने 252 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे,पुढेही धोका असताना जनजागृत्ती करून लसीकरण वाढविण्याची गरज असताना जिल्हा परिषदेचे जबाबदार अधिकारी असणारे 
जितेंद्र डुडी यांचे बालिश पणाचे तालुक्याबाबतचे वर्तन निषेधार्थ आहे,यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही,असा इशाराही संजय कांबळे यांनी दिला आहे.


जत शहरातील लसीकरण सेंटर समोर तब्बल दोनशे नागरिकांनी रांग लावली असतानाही,लस नसल्याचे कारण देत केंद्र कुलूप बंद ठेवले होते.