...आता ठिय्या मांडलेल्या अधिकाऱ्याविरोधात लढा ; बसवराज पाटील

जत,संकेत टाइम्स : अखेर जत पंचायत समितीच्या मनरेगा घोटाळ्यातील संशयित आरोपी प्रवीण शिवाजी माने यांची कनिष्ठ लेखापाल म्हणून झालेली नियुक्ती रद्द करण्यात आली असून मिरज पंचायत समितीचे संजय बाबूराव नाईक यांना प्रभारी पदभार देण्यात आल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढला आहे.मानेच्या नियुक्ती विरोधात संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
राज्यभरात तालुक्याची बदनामी केलेला मनरेगा घोटाळ्यातील कनिष्ठ लेखापाल माने यांच्यावर पोलीसात गुन्हा दाखल आहे. सध्या त्यांची चौकशीही सुरू आहे,असे असताना त्याच विभागात पुन्हा कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून माने यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्याला हजर करून घेत जंगी सत्कार करण्यात आला होता.या प्रक्रियेत कोणी हात पिवळे केले आहेत,हा संशोधनाचा विषय आहे.मात्र तालुक्याच्या अब्रुचे खोबरे करणारा माने हजर झाल्याचे सोशल मिडियावरून माहिती होताच संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत मानेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला‌ होता.अखेर जिल्हास्तरावरून हालचाली होऊन 'त्या' अधिकाऱ्याची तडकाफडकी सांगली जिल्हा परिषदेकडे बदली करण्यात आली आहे.विशेष म्हणजे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची भ्रष्टाचार झालेल्या खात्यात पुन्हा नेमणूक करण्याचा निंदनीय प्रकार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला होता.ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्याचा तपास सुरू असताना पुन्हा त्याच पदावर पंचायत समितीकडून वादग्रस्त मानेला हजरचं कसे करून घेतले,जंगी सत्कार करण्याचे धाडस दाखविणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यावर कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात यापुर्वीही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारी एक ‌यंत्रणा काम करत‌ आहे.वरिष्ठ अधिकारी,लोक प्रतिनिधी अशा प्रकाराला खतपाणी घालत असतील तर तालुक्याच्या जनतेला वाली आहे‌ का‌ नाही ? असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.सरपंच बसवराज पाटील म्हणाले की, जत तालुक्यातील सामान्य शेतकरी,नागरिक,मजूरांना वरदान असणारी मनरेगा सारखी मोठ्या प्रमाणात निधी मिळणारी योजना माने सारख्या अधिकाऱ्यांनी गिळकृत्त केली आहे. त्यामुळे तालुक्याची बदनामी तर झालीच मात्र मोठ्या प्रमाणात कामे होणाऱ्या योजनेला काळिमा लागला आहे.गेल्या पाच वर्षात मनरेगाचा कोट्यावधी निधी तालुक्याला मिळालेला नाही.त्याला सर्वस्वी माने सारखे अधिकारी जबाबदार असून आपल्या मतलबासाठी त्यांनी योजनेला भ्रष्ट करण्याचे पाप केले आहे.पोलीस तपास सुरू असताना त्यालाच परत त्याच पदाचा पदभार दिला जातो,यापेक्षा वाईट काय असू शकेल.माने सारखे भ्रष्ट अधिकाऱ्यांसह जे जे अधिकारी,कर्मचारी वर्षानुवर्षे जत तालुक्यात ठाण मांडून बसलेत, त्यांच्या बदलीसाठी यापुढे लढा उभारणार असेही पाटील म्हणाले.