ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव ; आ.विक्रमसिंह सावंत | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॉग्रेसचे आंदोलन

जत,संकेत टाइम्स : सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती.परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत,काँग्रेसने जतेत केंद्र सरकारचा निषेध करत तीव्र निदर्शने केली.
जत शहरातील मुख्य पेठेतील हनुमान मंदिरासमोर आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.


आ.सांवत म्हणाले, 
केंद्र सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आम्ही आंदोलन करत जनतेसमोर सत्य मांडण्याचे काम केले आहे. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.


फडणवीसांकडून जनतेची दिशाभूल
देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत.  फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली. पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहेत. 


ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप आ.सांवत यांनी केला. 
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,कार्याध्यक्ष नाना शिंदे,निलेश बामणे,परशूराम मोरे,नाथा‌ पाटील,अरविंद गडदे,सलीम पाच्छापूरे,सलीम नदाफ,भूपेंद्र पवार,गणी मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.


जत येथे ओबिसी आरक्षणसाठी कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.