उटगीत टेलरिंग दुकानला आग,एक लाखाचे नुकसान

माडग्याळ, संकेत टाइम्स : उटगी,ता.जत येथील शिराज पटेल यांच्या गाळ्यात भाडेकरू असलेले कबीर मुलाणी यांच्या टेलरिंग दुकानाला मध्यरात्री‌ अचानक आग लागून एक लाखाचे नुकसान झाले. त्यामध्ये तीन शिलाई मशीनसह 120 जोड शिवणकाम केलेले ड्रेस,फर्निचर,इलेक्ट्रॉनिक वस्तू असे लाखभराचे नुकसान झाले आहे.कबीर मुलाणी हे टेलरिंग दुकान रात्री आठ वाजता बंद करून घरी गेले. रात्री दोन वाजता आग लागल्याचे निदर्शनास आले. 


दुकानाला खिडकी नसल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते.आगीने लालबुंद झालेले शटर नागरिकांनी पाण्याचा मारा करत उघडले पण तोपर्यंत उशीर झाला होता. नशीब बलवत्तर म्हणून या दुकानाजवळ असलेल्या शब्बीर नदाफ यांच्या कापड दुकानाला आग लागणार इतक्यात उपस्थितांनी आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळला. दुकान जळाल्याने कापड शिवणकाम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मुलाणी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 


आग कशामुळे लागली शॉर्ट सर्किटने की अन्य कारणामुळे, अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती समजताच माजी सभापती बसवराज बिराजदार, सरपंचपदी महादेव कांबळे, उपसरपंच महानतेश पाटील यांनी भेट दिली.