पक्षनेतृत्वाला खुश करण्यासाठी संभाजी पाटील यांची धडपड | संतोष आठवले यांचा आरोप : माझ्यावरील आरोप पुराव्यासह सिद्ध केल्यास राजीनामा देऊ

तासगाव : तासगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी पाटील यांना सभापती व्हायचे आहे. हे पद पदरात पाडून घेण्यासाठी व पक्षनेतृत्वाला खुश करण्यासाठी ते धडपडत आहेत. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा पलटवार भाजपचे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी केला आहे. शिवाय त्यांनी जर माझ्यावरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी माझ्या सदस्यपदाचा राजीनामा देऊ, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. पंचायत समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

     
ते म्हणाले, कवठेएकंद येथील निविदा मॅनेज करण्यासाठी मी ग्रामसेवकावर दबाव टाकला, असा आरोप संभाजी पाटील यांनी माझ्यावर केला आहे. तो धादांत खोटा आहे. वास्तविक ग्रामसेवकाला निविदा मॅनेज करण्याचा अधिकारच नाही. कोणतेही टेंडर ऑनलाईन असते. त्यामुळे ते मॅनेज करणे अशक्य आहे. शिवाय मी काय ठेकेदार नाही. त्यामुळे निविदा मॅनेज करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पाटील यांचा आरोप निराधार, हास्यास्पद आहे.

    
आठवले पुढे म्हणाले, नागाव (कवठे) येथील ग्रामसेविका नंदिनी कुंभार या 11 मार्च 2021 पर्यंत वैद्यकीय रजेवर होत्या. असे असताना त्या 8 मार्च रोजी त्या महिला दिनाच्या पंचायत समितीतील कार्यक्रमास उपस्थित होत्या. शिवाय 4 व 5 जून रोजी कुंभार व कवठेएकंदचे ग्रामसेवक पी. टी. जाधव हे रजा मंजूर होण्याअगोदर ग्रामपंचायतीत गैरहजर होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. तर 6 जून रोजी वैद्यकीय रजेच्या कालावधीत ते शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमास ते गावात उपस्थित होते.

     

ते म्हणाले, कवठेएकंद येथे 4 महिन्यांपूर्वी भाजप - शेकापची सत्ता आली आहे. त्यापूर्वी याठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता होती. राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळातच याठिकाणचे 2 ग्रामसेवक निलंबित झाले आहेत. तर 4 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या काळात ग्रामपंचायतीत अनेक घोटाळे झाले. त्यामुळे ग्रामसेवक निलंबित झाले. त्यावेळी गुन्हे दाखल झालेले तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक फरार आहेत, असे पोलीस स्टेशनने जाहीर केले होते. ही गावासाठी शरमेची बाब होती.

     कवठेएकंदचे ग्रामसेवक जाधव यांच्याविरोधात मी 12 नोव्हेंबर रोजी आंदोलनास बसलो होतो. त्यावेळी गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी जाधव यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तसे पत्रही त्यांनी मला दिले होते. जर जाधव दोषी नसतील तर मग गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करतो, असे आश्वासन देणारे पत्र दिलेच कसे, असा सवाल करून गेल्या चार महिन्यात भाजप आणि शेकाप सत्तेत आल्यानंतर कोणतेही टेंडर प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे निविदा मॅनेज करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

     

ते म्हणाले, तालुक्यात अनेक ग्रामसेवक चांगले आहेत. सर्वांच्या विरोधात आपली तक्रार नाही. पण, काहीजण कामचुकार आहेत. राष्ट्रवादीला सत्तेच्या काळात प्रशासनावर अंकुश ठेवता आला नाही. सत्ताधारी निष्क्रिय आहेत. त्यांना उठावदार काम करता आले नाही. म्हणून मी विरोधक म्हणून काम करीत असताना जे चुकीचं होतंय ते उघडकीस आणले तर माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. शिवाय प्रशासनाबद्दल मला आदर आहे. म्हणूनच मी सदस्यपदाचा बडेजाव न करता अधिकाऱ्यांच्या टेबलपर्यंत जाऊन सर्वसामान्यांची कामे करतोय. पण प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नको आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांची पदांची संगीत खुर्ची सुरू आहे. परिणामी प्रशासन बेलगाम झाले आहे.

प्रशासनाच्या बुडाखालील अंधार लवकरच पुराव्यासह जनतेसमोर मांडू : आठवले*

    तासगाव पंचायत समितीत अनेक चुकीचे प्रकार घडत आहेत. या कामांना प्रशासन पाठीशी घालत आहे. अनेक प्रकरणांत प्रशासनाचाही सहभाग आहे. प्रशासन चुकीच्या पद्धतीने चाललं आहे. लवकरच प्रशासनाच्या बुडाखालील अंधार पुराव्यांसह जनतेसमोर मांडू, असेही यावेळी आठवले यांनी स्पष्ट केले.