एपीआय कोळेकर यांच्या कामाची चौकशी करुन बदली करा ; निवृत्ती शिंदे यांची मागणी | तळ ठोकलेल्या कर्मचाऱ्यांना हाकला

बालगाव,संकेत टाइम्स : उमदी पोलिसां बद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्याना पाठीशी घालुन अवैध धंदेवाल्यांची माहिती देणाऱ्या खबरी यांची नावे गुपित न ठेवता त्यांची नावे अवैध धंदेवाल्याना सांगून माहिती देणाऱ्याना धमकावण्याचा पराक्रम उमदी पोलीस करत आहेत,सपोनि दत्तात्रय कोळेकर यांच्या कामाची चौकशी करून बदली करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला.शिंदे म्हणाले की, उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंवैध धंदे वाढले आहेत.या भागात‌ पोलिसांचा वचकच राहिला नाही.पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून चेकपोस्ट नजीकच गावगुंडाच्या टोळक्यानी नवविवाहित तरुणीस तिच्या पतीसमोरच तलवारीचा धाक दाखवून पळवून नेले,मात्र अद्याप त्याचा काडीमात्र तपास पोलिसांनी केला नाही. याउलट अवैध धंदे वाढवण्यासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अवैध धंद्यासाठी मलिदा गोळा करण्यासाठी काही ठराविक पोलिसांची नियुक्ती केली गेली आहे. 


तसेच कोरोणाच्या महामारीत आम्ही ग्रामपंचायत व नागरिक यांनी मिळून स्वयंमपुर्तीने गाव बंद ठेवून कोरोनाचा अटकाव केला मात्र उमदी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय कोळेकर यांनी दहशत माजवण्यासाठी दुध घालण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यासह कामासाठी जाणाऱ्या मंजुराना अडवून विनाकारण नाहक त्रास दिला आहे. दुकानदारांना विनाकारण 10-10 हजार रूपयाचा दंड केला आहे.तिकोंडीत‌ पोलीसांना झालेली मारहाण पोलीसांच्या दहशतीचा रोषच आहे.
यासाठी पुर्णपणे सपोनि दत्तात्रय कोळेकरच जबाबदार आहेत. तसेच एखादी तंटा मिटवण्यासाठी गेलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रकार उमदी पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आर.आर. आबा यांच्या तंटामुक्ती संकल्पनेला या अधिकारी यांच्या नजरेत काडीमात्र किंमत नाही.


 तसेच चोरांना मुद्देमालासह पकडून दिले तरी त्याच्या वरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हप्तेखोर पोलिसांची चौकशी करावी, अनेक दिवसापासून तळ ठोकलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची बदली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी माजी उपसरपंच चंदु नागणे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव सातपुते, सरदार जकाते उपस्थित होते.