शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व अनुज्ञप्ती परवानासाठीच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करू नका अन्यथा कारवाई

सांगली : परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ
अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने करण्याची प्रणाली दि. 14 जून 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. या लोकाभिमुख सोयीसुविधांचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा यथास्थिती करण्यात येत आहेत. ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर आवश्यक ती पोलीस कारवाई करण्याच्या तसेच या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल अशी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तरी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.

        

ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफे अशा संस्थांविरूध्द पोलीस कारवाई तर केली जाईल पण या व्यतिरिक्त महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफेविरूध्द संबंधितांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांनी गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही श्री. कांबळे यांनी केले आहे.

            या प्रणालीमध्ये नागरिकांना येणाऱ्या काही इतर अडचणी जसे आधारकार्ड क्रमांक व त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या पध्दतीने प्रदर्शित होत असल्यास अथवा त्या प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) दिल्ली व पुणे यांच्याशी समन्वय साधून त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.