वचिंत गावांना पाणी पोहचविण्यासाठी 'म्हैसाळ'चा विस्तार फायद्याचा

सांगली : कर्नाटकातील स्वतंत्र पाणी योजनेऐवजी म्हैसाळ योजनेची विस्तारित जत उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुराव्याची गरज
असल्याचा सूर सांगली व्हिजन फोरमच्या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला. 'जत तालुका पाणीदार' या विषयावर परिसंवाद झाला. फोरमचे समन्वयक सुरेश पाटील यांनी आयोजन केले होते.


सुरेश पाटील म्हणाले, जतला पाण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्षमण सवदी तसेच माजी केंद्रीय मंत्री स्व. सिद्धू न्यामोंडा, आमदार आनंद न्यामगोंडी यांच्याकडे मागणी केली होती. राजापूरपासून पडसलगी बंधाऱ्यापर्यंत दोन लाख एकर ऊस आहे. उन्हाळ्यात कृष्णा कोरडी पडत असल्याने ऊस वाळतो. दरवर्षी दीड हजार कोटींचे नुकसान होते. जलसंपदा मंत्री जंयत पाटील व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यातील बैठकीनंतर नुकसान टळणार आहे.


महाराष्ट्राला चार टीएमसी पाणी मिळण्याने जत‌ व सोलापूरातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक म्हणाले,105 गावांसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार झाला आहे.'तुबची-बबलेश्वरमधून महाराष्ट्राने स्वतंत्रपणे स्वखर्चाने योजना करण्याचा प्रस्ताव कर्नाटकने दिला आहे. नव्या कोट्टलगी योजनेत सहभागाचाही प्रस्ताव आहे. त्याऐवजी म्हैसाळचा विस्तार फायदेशीर ठरेल,मल्ल्याळ येथे पाणी टाकून तेथून सर्व गावांना पाणी देता येईल.म्हैसाळ विस्तारित जत योजना तिसरा टप्पा या नावाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, त्याला सुमारे 700कोटींचा खर्च आहे.