सांगली जिल्ह्यात 35 रुग्णवाहिकेचे लोकार्पणआरोग्य यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य ; पालकमंत्री

सांगली : कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर जसजशी रुग्णांची संख्या वाढु लागली त्यावेळी आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला. या काळात प्रामुख्याने कोरोना बाधितांसाठी रुग्णवाहिका कमी पडु लागल्याने रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला . त्यामुळेच आज 14 व्या वित्त आयोगाच्या व्याज निधीतून 28 रुग्णवाहिका व शासनाकडून 7 रुग्णवाहिका अशा एकूण 35 रुग्णवाहिका या जिल्ह्यास प्राप्त झाल्या. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. पुढील काळात जिल्ह्यात आरोग्य व शिक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करु असे उदगार पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले.


पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या 35 रुग्णवाहिका लोकापर्ण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरुण लाड, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक गेडाम, जिल्हा परिषदे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील, जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, तानाजी लोखंडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदी उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ग्राम विकास खात्याने 14 व्या वित्त आयोगाच्या व्याज निधीमधून चार कोटी रुपये सांगली जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका खरेदीसाठी दिले. यातून 28 रुग्णवाहिका खरेदी केल्या  तर शासनाकडून 7 रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिका प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. या पुढील काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध अत्यावश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातून विशेषत: जत, शिराळा अशा लांबच्या तालुक्यातून रुग्णांना सांगली, मिरजेत आणण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता भासते. अशा रुग्णवाहिका प्रत्येक तालुक्यात देण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येईल. जे लांबचे तालुके आहेत त्यांना प्राधान्याने कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आरोग्याबरोबरच प्राथमिक शाळा सक्षम करण्यावरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी माझी शाळा आदर्श शाळा अभियान राबविण्यात येणार असून या अंतर्गत प्राथमिक स्वरुपात 141 शाळा सक्षम करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाच्या दर्जाबरोबरच शिक्षकांचीही दर्जा सुधारण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. 


या अभियानांतर्गत शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासनस्तरावर निधीची तरतुद करण्यात येत असून खासगी संस्थांकडूनही या अभियानासाठी निधी मिळणार आहे. जिल्ह्याचा आरोग्याचा व शिक्षणाचा पाया भक्कम झाल्यास येणारी पिढी ही सक्षम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्ह्यात सुरु असलेल्या आशा वर्कर्सच्या मागण्या शासनाकडे सादर करु व त्यांना योग्य न्याय देऊ असेही ते म्हणाले. कोरोना काळात जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत.

 यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीचे संकट जगातील 220 देशांमध्ये आले आहे. अनेक महामाऱ्या आल्या पण अशी महामारी प्रथमच आली. आपल्याही देशात, राज्यात ही कोरोना महामारी आली आहे. या कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासनाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येते. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून कोरोना समुळ नष्ट करण्यासाठी कोरोना मुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्रत्येक गावाने चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी केली तर आपले गाव कोरोना मुक्त होईल. त्यामुळे तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होईल. या स्पर्धेस प्रोत्साहन म्हणून विभागीयस्तरावर तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये 50 मार्कांचा समावेश आहे. 


यास्पर्धेत विभागीयस्तरावर तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. विभागात पहिला येणाऱ्या ग्राम पंचायतीला 50 लाख तसेच विकास निधीसाठीही 50 लाख असे 1 कोटी देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25 लाख तसेच विकास निधीसाठीही 25 लाख असे 50 लाख तर तिसऱ्या क्रमांकासाठी 15 लाख तसेच विकास निधीसाठीही 15 लाख असे 30 लाख इतके बक्षिस देण्यात येणार आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीमधून काम करण्यासाठी दोन निर्णय घेण्यात आले . यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 5 कोटी लोकांना आरसेनिक अल्बम या गोळ्याचे वाटप करण्यात आले. तर आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्राम विकास विभागाच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनिस, जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यु आल्यास 50 लाख विम्याचे कवच देण्यात आले. कोरोनामध्ये मयत झालेल्या विमा कवच लागू असलेल्या संबधित 160 कर्मचाऱ्यांच्या वारसांना याचा लाभ देण्यात आला.

यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्हा आरोग्य सेवेबाबत सक्षम करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सज्ज असून संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठीही तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाप्रशासन व जिल्हा परिषद यंत्रणा तयारी करत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्याकाही उणिवा राहिल्या आहेत, त्या उणिवा दुर करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यास आतापर्यंत नवीन 55 रुग्ण्वाहिका मिळाल्या आहेत. त्याचबरोबर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका वाढविण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी आता कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्यकता असून त्याही वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने अहोरात्र काम करुन कोरोना अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यकते नूसार डीपीडीसीमधूनही निधी उपलब्ध करुन दिला आहे, असे सांगून जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु असलेल्या कोरोना उपायायोजनांची सादरीकरण यावेळी केले.