शिक्षक बँकेने 10 लाखाचे कोविड कर्ज द्यावे ; अविनाश सुतार

जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या शिक्षक बँकेने सर्वच सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या कोविड कर्जाच्या धर्तीवर 6 टक्के व्याजाने 10 लाख रुपये कोविड कर्ज हे 10 वर्षांच्या मुदतीने द्यावे,असे कर्ज देऊन बँकेने या निमित्ताने शिक्षकांना अडचणीच्या परिस्थितीत साथ द्यावी अशी, मागणी जत तालुका शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष अविनाश सुतार यांनी केली आहे.


सुतार म्हणाले,गेल्या दीड वर्षापासून  महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या महामारीच्या कालावधीत अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत.काही शिक्षक किंवा कुटुंबीय हे कोरोना बाधित झाले होते.त्यांनी दवाखाना व औषधोपचारा साठी लाखो रुपये खर्च केले आहेत,पैशांची गरजही आहे,पगारही वेळेत होत नसल्याने आर्थिक चणचण भासत आहेत.त्यामुळे असे कर्ज देऊन शिक्षक बँकेने आर्थिक हातभार लावावा.
सुतार म्हणाले,बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या वरील नियंत्रण सुटलेले आहे.
बँकेमध्ये कोविडच्या नियमांच्या नावाने काही शाखांमध्ये चालू असणारी मनमानी वेळीच लक्ष घालून थांबवावी.शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत.बँकेचे कर्ज व्याजदर हे दिवसावरती अवलंबून आहेत.उशीरा होणाऱ्या पगारामुळे जास्तीचे व्याज भरावे लागते. बँकेने याचा सहानुभूतीने विचार करून सर्वच कर्जांची व्याजदर आकारणी मासिक करावी.
यावेळी मल्लया नांदगाव दिगंबर सावंत,जितेंद्र बोराडे, रावसाहेब चव्हाण, बाळासाहेब सोलनकर उपस्थित होते.