अजितदादांच्या फोननंतर रोहित पाटील मध्यरात्री ऑक्सिजन घेऊन ग्रामीण रुग्णालयात

तासगाव : रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला.'रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरून घे'. अजितदादांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरून घेतला. त्यांनतर यातील 23 जंबो टाक्या व 2 डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.

     


तासगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज शंभरहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य खासगी ठिकाणी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आली आहेत. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही जिल्हाभर बेड शोधताना फरफट होत आहे.

        

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन टँकर पळवण्याचे प्रकार समोर येत आहेत. तासगावतही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. शनिवारी दिवसभर तर ऑक्सिजन पुरवून वापरण्यात येत होता. रुग्णांलयातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इकडून - तिकडून लहान - मोठ्या ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली. जोपर्यंत ऑक्सिजन टँकर येत नाही तोपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू दिला नाही.

      


शनिवारच्या या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करीत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती.

     


अखेर काल मध्यरात्री अजित पवारांनी रोहित पाटील यांना फोन केला. 'रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरून घे'. अजितदादांच्या या सुचनेनंतर रोहित पाटील स्वतः मध्यरात्री घरातून बाहेर पडले. भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरून घेतला. त्यानंतर ऑक्सिजनच्या 23 जंबो टाक्या व दोन डुरा टाक्या घेऊन मध्यरात्री 2.30 वाजता रोहित पाटील ग्रामीण रुग्णालयात उपस्थित झाले. एवढ्या मध्यरात्री रुग्णांना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी रोहित पाटलांची ही धडपड पाहून रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर स्टाफ आवक झाला.

     


 यावेळी रुग्णांच्या सेवेसाठी आणि काय करावे लागत असेल तर सांगा. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी मी व माझे कुटुंबीय रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.