संखमध्ये तहसीलदारांचा ‌दणका,दुकाने केली सील

जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथे कोरोनाचे रुग्ण ‌वाढत असल्याने गावात जनता कर्प्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तरीही नियम डावलून सुरू असलेल्या गडदे यांचे कापड दुकान तहसीलदार हणमंत म्हेत्रे,संरपच मंगलताई पाटील यांनी सील करत दणका दिला.
संख येथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत,अप्पर तहसील,पोलीस सतर्क झाले आहेत.गावात गेल्या पाच दिवसापासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. दवाखाने,मेडिकल वगळता अन्य दुकाने सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही काही दुकाने स्वेटर बंद करून सुरू असल्याचे तहसीलदार हणमंत म्हेत्रे व संरपच मंगलताई पाटील,ग्रामविकास अधिकारी के.डी.नरळे यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या.
त्यांनी गावात दुकानाची तपासणी केली असता गडदे यांचे कापड दुकान सुरू असल्याचे पथकाला आढळून आल्याने ते दुकान सील करण्यात आले.कोरोनाचा फैलाव वाढत असताना अशी बेजबाबदारी धोकादायक ठरत असून कोरोनाचा संसर्ग वाढवत असल्याचे समोर येत आहे.
तहसीलदार हणमंत म्हेत्रे म्हणाले,संखसह परिसरात कोरोना संसर्ग वाढला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे पुढील काही दिवस कडकडीत बंद पाळण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांचा हलगर्जीपणा धोका वाढविणारा ठरत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यास मनाई आहे.तरीही सुरू असणारी दुकाने सील करण्याची कारवाई करावी लागत आहे.
मंगलताई पाटील म्हणाल्या,संखमध्ये कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात आहे,नागरिकांनी पुढील काही दिवस खबरदारी घ्यावी, दुकाने पुर्णत: बंद ठेवावीत रुग्ण वाढल्यास आणखीन काही दिवस बंद वाढवावा लागेल.


बेजबाबदार पणे कोणीही वागू नये,कोरोनाचे संकट सगळ्यांना अडचणीत आणणारे आहे.ते दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाने खबरदारी गरजचेची आहे.प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन पाटील यांनी केले.