येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार ; विक्रम ढोणे

जत,संकेत टाइम्स : येळवी ता.जत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार आरोग्य सेविकेच्या जीवावर कोरोनाच्या गंभीर परस्थितीमध्ये‌ सुरू असून वैद्यकीय अधिकारी घरात बसून कारभार हाकत‌ असल्याने आरोग्य सेवेच्या गलथानपणाचा कळस गाठला असल्याचा आरोप युवा कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केला आहे.विशेष म्हणजे कोव्हिड आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घरातूनच माहिती देतात हे व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये उघड झाले आहे.यावरून जत तालुक्यातील आरोग्य विभाग किती निष्काळजी आहे,हे‌ स्पष्ट झाले आहे.येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी राहत नाही.फक्त एकच आरोग्य सेविका 24 तास कार्यरत असून त्यांच्या जीवावर येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालू आहे,तसेच दोन ऑक्सिजन बेड असूनही ऑक्सिजन लावण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने ऑक्सिजन बेड असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. तालुक्यात सर्वात जास्त कोरोणा रुग्ण येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावामध्ये असताना तालुका वैद्यकीय अधिकारी यांची या सर्व गैरप्रकाराला मूकसंमती आहे का?त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे,असेही विक्रम ढोणे म्हणाले.