भावाच्या मृत्यूनंतरही या नगरसेवकाची कोरोना रुग्णांसाठी धडपड

तासगाव : स्वतःच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू होऊन अवघे तीन दिवसही उलटले नाहीत, तोपर्यंत आपल्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला करत, येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी कोरोना रुग्णांसाठी धडपड सुरू केली आहे. 


आपल्या कुटुंबावर नियतीने घाला घातल्यानंतरही सावंत दुसऱ्याची कुटुंबे वाचवण्यासाठी धडपडत आहेत. भावाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवसापासून ते रुग्णसेवेत हजर झाले आहेत. आतापर्यंत इद्रिस मुल्ला यांना सोबत घेऊन सावंत यांनी 12 ऑक्सिजनचे सिलिंडर ग्रामीण रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयांना पोहोच केले आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तासगाव तालुक्याची झोप उडवली आहे. दररोज शेकडो रुग्णांना कोरोना कवटाळतो आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांचे नातेवाईक रात्रीचा दिवस करीत आहेत. तर अपुऱ्या बेडवर रुग्णांना सेवा देण्याच्या प्रयत्नात प्रशासकीय यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. एकीकडे अपुऱ्या बेडची समस्या यंत्रणेची डोकेदुखी ठरत असताना दुसरीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रशासकीय यंत्रणेलाच 'व्हेंटिलेटर'वर जावे लागण्याची चिन्हे आहे. तासगावातील हॉस्पिटलमध्ये तर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अक्षरशः पुरवून ऑक्सिजन वापरण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे. याकाळात विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष हॉस्पिटल्सना ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवण्यासाठी धडपडत आहेत.
येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत यांच्या भावाचे तर तीन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले. तरण्याताट्या भावाचे निधन झाल्यानंतर सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या तीन दिवसंपासून अख्खे कुटुंब दुःखात आहे. मात्र, तरीही आपल्या कुटुंबावर नियतीच्या घाल्यामुळे ओढवलेले दुःख बाजूला ठेवून बाळासाहेब सावंत यांनी स्वतःला कोरोना रुग्णांच्या सेवेत गुंतवून घेतले आहे. अगदी भावाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवसापासून सावंत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत. आतापर्यंत त्यांनी इद्रिस मुल्ला यांना सोबत घेऊन ग्रामीण व खासगी रुग्णालयांना 12 ऑक्सिजन सिलिंडर मिळवून दिले आहेत. यातील काही सिलिंडर लोकसहभागातून तर काही स्वतःच्या खिशातून पैसे घालून दिले आहेत.

     
आज (सोमवार) ग्रामीण रुग्णालयाची ऑक्सिजनची गाडी यायला थोडा वेळ झाला. त्यामुळे रुग्णालयातील 51 रुग्णांचा ऑक्सिजन बंद पडण्याची भीती व्यक्त होत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सावंत व मुल्ला यांनी चार ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देऊन अनेक रुग्णांचा धोका टाळला. स्वतःच्या भावाच्या तिसऱ्या दिवसाच्या विधी उरकून सावंत यांची रुग्णांसाठीची धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे.डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विद्यासागर कांबळे यांचे सहकार्य : सावंत, मुल्ला


ऑक्सिजनचा सगळीकडेच तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या गाड्या यायला उशीर होत आहे. तोपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे जिकिरीचे होत आहे. मात्र युवा नेते रोहित पाटील यांनी कोणत्याही स्थितीत रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते इकडून तिकडून रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी रात्रंदिवस झटत आहोत. आज येथील प्राजक्ता हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह डॉ. विद्यासागर कांबळे यांच्या सहकार्यातून दोन ऑक्सिजन सिलिंडर मिळाले, अशी माहिती बाळासाहेब सावंत, इद्रिस मुल्ला यांनी दिली.