कोरोना महामारीच्या काळातील परिचारीकांची सेवामानव समाज सदैव स्मरणात ठेवील ; जिल्हाधिकारी

सांगली : आपली वैयक्तिक सुख-दु:खे बाजूला सारून रूग्णांच्या वेधनेवर फुंकर घालण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या परिचारीका (नर्सेस) या आरोग्य सेवेचा मजबूत कणा आहेत. आई जशी आपल्या लहान मुलाला ममतेने, करूणेने सांभाळते त्याच करूणायुक्त अंतकरणाने नर्सेस (परिचारीका) आजारपणाच्या काळात रूग्णांची काळजी घेतात. रूग्णाची सेवाभावाने सुश्रुशा करत असतानाच त्यांना हळूवाळरपणे धीरही देत असतात. एक वर्षाहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना नर्सेसनी जीवाची बाजी लावून केलेली रूग्णसेवा संपूर्ण मानव समाज सदैव स्मरणात ठेवील, अशा शब्दात नर्सेसच्या कार्याचा गौरव करत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिचारीका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

      


रूग्ण सेवेचा पाया रचणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस म्हणजेच 12 मे जगभर नर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यांचा आदर्श घेवून आज हजारो नर्सेस महामारीच्या काळात प्राणाची पर्वा न करता रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेवून अखंड सेवा बजावत आहेत. रूग्णसेवा करत असताना अनेक परिचारीका स्वत: आजारी पडल्या. 


अनेकांनी आपल्या जवळची माणसे गमावली. पण या साऱ्यांवर मात करत पुन्हा त्या या लढाईत कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांची सेवा, त्यांचा त्याग यांचा सन्मान करणे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिचारिका दिनानिमित्त भावना व्यक्त केल्या.