येळवीच्या राजकारणातील झुंजार नेता काळाच्या पडद्याआड

येळवीच्या राजकारणातील एकेकाळचा झुंजार नेता राजाभाऊ संगाप्पा अंकलगी यांचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला.सन 1979 ते 1984 या काळात स्व.रामलिंग पट्टणशेट्टी(शेटजी) हे येळवीचे सरपंच असतानाच युवा नेतृत्व म्हणून राजाभाऊ यांचा राजकीय उदय झाला.एक हरहुन्नरी, धैर्यवान आणि खिलाडूवृत्तीचा तरुण म्हणून येळवीच्या राजकारणात त्यांचा दबदबा वाढत गेला.सन 1984 ते 1992 या कालखंडात स्व.श्रीधर पतंगे (गुरुजी) सरपंच तर राजाकाका उपसरपंच झाले. राजाकाकांनी पतंगे गुरुजीबरोबर सलग आठ वर्षे उपसरपंच म्हणून काम पाहिले. 
सन 1980 च्या दरम्यान सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्व. वसंतदादा पाटील व स्व. राजारामबापू पाटील यांचे दोन गट होते.जत तालुक्यातील प्रमुख गांवात या गटांत चुरस असे. अंकलगी घराणे सुरुवातीपासून राजारामबापू गटाचा अनुनय करणारे. स्व. बापूंचे जाने. 1984 मध्ये निधन झाले.पुढे जत तालुक्यातील बापू अनुयायींनी विश्वासदाजी पाटलांना साथ दिली. त्यात येळवीच्या अंकलगी गटाचा वाटा मोठा आहे. पण कालौघात जनता दलाची ताकत कमी होऊ लागली..आणि राजाकाकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सेना नेते रावसाहेब घेवारे, गजानन आडके, आप्पासाहेब काटकर, पुरुषोत्तम बोराडे, बाबुराव दुधाळ यांच्या उपस्थित येळवीत शिवसेनेची पहिली शाखा काढली. 


पुढे 1995 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवार  आनंदराव अडसूळ यांचा झंझावती प्रचार केला. शिवसेना उमेदवार अडसूळ यांचा निसटता पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. स्थानिक राजकारणाचा विचार करता, पुढे ते विलासराव जगताप यांच्या गटात गेले आणि सन 1997 साली बनाळी जिल्हा परिषद गटांतून काँग्रेसचे मातब्बर नेते स्व.विजयसिंह डफळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी राजाकाकांनी डफळे सरकारांना कडवी झुंज देत अक्षरशः घाम फोडला पण बनाळी जि.प.गटातून राजाकाकांचा पराभव झाला. शिक्षण सभापती विजयसिंह डफळे या राजघराण्यातील वंशजाला घाम फोडणारा येळवीचा ढाण्या वाघ अशी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची ओळख निर्माण झाली.
 पुढे 1997 साली झालेल्या येळवी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत 9 पैकी 7 सदस्य निवडून आणून त्यांनी आपल्या गटाची सत्ता स्थापन केली. राजाभाऊंनी राजकारण, समाजकारणात अनेक चढ-उतार पाहिले. राजकारणाबरोबर क्रीडा कला क्षेत्राची अभिरुची जपणारे काका हे एकेकाळचे उत्तम व्हाॅलीबाॅलपटू होते. अंकलगी घराण्यातील राजाकाका हे पहिले उपसरपंच, दुसरे डाकूअण्णा तर तिसरे सुनिल,सुनिलच्या रुपाने अंकलगी घराण्याने उपसरपंच पदाची हॅट्रीक केली आहे,याचा पाया राजाभाऊ काकांनी घातला होता. अलीकडे राजकारणापासून अलिप्त राहून समाधानाचे जीवन व्यतीत करत असतानाच या कोरोनाने घाला घातला आणि गुरूवार 29 एप्रिल 2021 रोजी पहाटे त्यांचे निधन झाले.

शंब्दाकंन ;
श्री. प्रकाश गुदळे, येळवी