शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडले | शिक्षक भारतीची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

जत,संकेत टाइम्स : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. गुढी पाडवा सण गेला, आज राम नवमी आहे. आणि रमजानचा पवित्र महिनाही सुरु झालेला आहे. महिन्याची 20 तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.मागील महिन्यातही असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलं. शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे वेळेत पैसे न मागितल्यामुळे पगार उशिरा झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी वित्त सचिवांना भेटून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर हालचाली होऊन फेब्रुवारीचे पगार झाले. तरी सुद्धा अद्यापही काही जिल्ह्यात फेब्रुवारीचे पगार झालेले नाहीत.मार्च पेड इन एप्रिल पगार न होण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी सांगितल्या जात आहेत. मात्र या सर्वांचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोविड काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेकजण कोविडग्रस्त असून उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कर्जाचे हफ्ते थकलेत. दंड, व्याज भरावे लागत आहे. आणि या सगळया परिस्थितीत शिक्षण विभाग मूक गिळून बसलेला आहे.आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण विभागातल्या या दिरंगाईवर आणि शिक्षण विभागातले अधिकारी काम करत नाहीत, याबद्दल आवाज उठवला. तेव्हा काम करायचं राहिलं बाजूला पण शिक्षण सचिवांनी विधान परिषदेच्या सभापतींकडेच आमदार कपिल पाटील शिक्षकांच्या हिताच्या निर्णयांसाठी दबाब टाकतात, अशी तक्रार केली आहे. अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या शिक्षण सचिवांनाच हटवा अशी मागणी शिक्षक भारतीने आज केली आहे.