आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन

 काश्मीर हे भारताचे नंदनवन असून अखिल विश्वाला मोहित करणारे पर्यटनकेंद्र आहे. स्वर्गाची प्रचिती देणाऱ्या काश्मीरमध्ये आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे. फुल शेती व पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इ.स.2007 मध्ये ट्युलिप गार्डनचे उद्घाटन झाले.35 हेक्टर क्षेत्रफळ भागातील या उद्यानात यावर्षी 62 प्रजातीचे 15 लाखाहून ट्युलिप व मोसमी रोपटी लावलेली आहेत. दरवर्षी येथे ट्युलिप महोत्सव मोठ्या दिमाखात महिनाभर सुरू असतो. देश-विदेशातील अनेक पर्यटकांचा ओढा या महोत्सवा कडे असतो.

     दल सरोवराजवळील या गार्डनला चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे.ट्युलिप गार्डनमध्ये बदाम, जर्दाळू आणि चेरीच्या विविध वनस्पती आहेत. पलांडू कुलातील ट्युलिपा या वंशातील कोणत्याही वनस्पतीला ट्युलीपा  म्हटले जाते.ट्युलिप फुले सामान्यता एप्रिलमध्ये फुलतात. परंतु यावेळी येथे पर्यटकांसाठी जवळपास 3 लाख नवीन ट्युलिपस लावल्या आहेत. ज्या हिवाळ्यामध्ये बहरतात. ट्यूलिप ही वनस्पती आकर्षक फुलांसाठी प्रसिद्ध आहे. तिची लागवड कंदापासून केली जाते. ट्यूलिप वनस्पतीचे खोड सर्वसाधारणपणे 60 सेंटिमीटर उंचीचे असते.

 

याच्या खोडाला शाखा नसतात. तळाला दोन किंवा अधिक चिवट लांब व अरुंद अंडाकृती पाने असतात. फुलात एकेरी व दुहेरी असे प्रकार आहेत.पेलेच्या अथवा घंटेच्या आकाराची फुले खोडाच्या टोकाला प्रत्येक खोडावर एक याप्रमाणे येतात. ही फुले विविध रंगी असतात. मध्यम प्रकारच्या चांगल्या निचऱ्याची जमीन या वनस्पतीसाठी आवश्यक असते. या बागेत ट्युलिपचे  सुमारे 4000 प्रकार वर्णिले आहेत. बेल्जियम, इंग्लंड ,अमेरिका आणि ब्रिटिश कोलंबिया या देशात कंदाची व्यापारी प्रमाणावर लागवड होते.

कांबळे चंद्रकांत हरीबा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुगळगाव ता.उमरगा जि. उस्मानाबाद