जत तालुक्यात संचारबंदीमुळे रात्री रस्त्यांवर सन्नाटा

जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 ते सकाळी 7 वाजण्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाची जत पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, तसेच गुन्हाही दाखल करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्री रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दररोज रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात ठिकठीकाणी अशा पद्धतीने कारवाई होत आहे.पोलीस शहरात लक्ष ठेवत आहेत. गर्दी करणाऱ्या व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना प्रथम समजावून सांगण्यात येत आहे. त्यानंतर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात रात्री शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी 7 वाजल्यापासून नोकरदार घराकडे धाव घेताना दिसून येत आहेत. रात्री आठपर्यंत रस्त्यांवर ही वर्दळ राहते, तर आठनंतर पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी सुरू होते. सबळ कारणाअभावी कोणी रस्त्यावर फिरत असेल, तर संबंधितावर तत्काळ कारवाई होते. परिणामी, रात्री आठनंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.