वाळेखिंडीत डाळींब चोरीला | चोरट्याकडून शेतमुजरावर दगडफेक ;

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतकरी महादेव हिंगमीरे या शेतकऱ्याची उभ्या डाळींब पिकातील डाळींब चोरीला गेल्याची घटना घडली आहे.एकशे बत्तीस रुपये प्रति किलो असा दर मिळालेल्या एकूण साडे चार टन डाळींब अज्ञात चोरट्यांनी चोरून जाताना त्यांना रोकणाऱ्या शेतमुजरावर दगडफेक केली आहे.याबाबतची फिर्याद शेतकरी महादेव हिंगमीरे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,वाळेखिंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला शेतकरी हिंगमीरे यांच्या मालकीची डाळींब बाग असून एकूण दोन हजार पाचशे झाडांची लागवड केली आहे.सध्या डाळींब बाग जाण्याचा हंगाम सुरू असून 132 प्रती किलो असा दर व्यापाऱ्यांनी दिला होता.याचवेळी गेल्या काही दिवसांपासून टप्याटप्याने अज्ञात चोरट्यानी बागेतील थोडी थोडी डाळींबाची चोरी केली होती.झाडे भरपुर असल्याने चोरीचा प्रकार लक्षात आला नाही.दरम्यान सोमवार मध्यरात्री अज्ञात चोरटे बागेत आले होते.यावेळी हिंगमीरे यांच्या शेतात कामाला असणारा शेतमजूर शहाजी पवार बागेला विद्राव्य खत शेतात घालत होता.यावेळी त्याला बागेत काहीतरी आवाज आला.आवाजाच्या दिशेने गेला असता दोन दुचाकीवरून आलेले अज्ञात चोरटे त्याला दिसले.चोरट्यांचा पाठलाग केला असता त्यांनी जोरदार दगडफेक केली.यामध्ये शहाजी पवार यांच्या हाताला व पाठीला मार लागला.त्यानंतर त्यांनी ही घटना शेतकरी हिंगमीरे यांना सांगितली.तोपर्यंत चोरट्यानी पलायन केले.तसेच त्यांच्या शेजारी असणारे शेतकरी भाऊसाहेब सुखदेव यादव यांच्या शेतातील चौदा एकर क्षेत्रातील ड्रीपचे साहित्य,किर्लोस्कर इंजिन व शेतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरले असल्याची घटना घडली आहे.यामुळे वाळेखिंडी परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.