पहिल्याच रात्री 'कर्फ्यू'चा फज्जा | जत‌ शहर सुरूच ; पोलिसांचा बंदोबस्त नावापुरताच

 

जत,संकेत टाइम्स : राज्य सरकारने सोमवारी रात्री 8 पासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीसह लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केली.जतेतील बहुतेक व्यापाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत रात्री 8 नंतर दुकाने बंद केली.मात्र व्यापारी आणि दुकानदारांची अनेक भागात आवराआवर सुरू असलेली दिसली,असे असले तरी, बहुतेक भागात फेरीवाले आणि नागरिकांची बेपर्वाई जाणवली.


पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये आदी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या.
वडापाव,पाणीपुरी, भेळ आदी फेरीवाल्यांनी मात्र संचारबंदीचा नियम कुठेच पाळलेला दिसला नाही. त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली झालेली दिसली. ग्राहकही गर्दी करून आस्वाद घेताना दिसत होते.
शिवाजी चौक परिसरात तर काही मीटरच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू होता.दुकानदारांमध्ये संभ्रम

संचारबंदी आणि लॉकडाऊनसंदर्भात अनेक दुकानदारांमध्ये संभ्रम दिसला. यापुढे कायम 30 तारखेपर्यंत दुकाने बंद ठेवायची, की फक्त शनिवारी व रविवारी बंद ठेवायची, अशी विचारणा करताना अनेकजण दिसले. बंद दुकानांसमोर उभ्या असलेल्या दुकानदारांमध्येही यावरच चर्चा सुरू असलेली दिसली.पोलिसांचा बंदोबस्त नाही

रात्री 8 वाजता संचारबंदी सुरू झाली असली तरी, कोणत्याही चौकात पोलिसांचा बंदोबस्त दिसला नाही. सर्रास वाहतूक सुरू होती. अनेक ठिकाणी टोळक्यांच्या विनामास्कने गप्पा रंगलेल्या होत्या. मात्र त्यांना हटकताना कुणीच दिसले नाही.काही चौकात बंदोबस्तावर पोलीस दिसले. मात्र रात्री 9.30 नंतरही तेथील गर्दीवर पोलिसांचे कसलेच नियंत्रण दिसले नाही.जतेत मंगळवारचा‌ बाजार भरला

निर्बंध असतानाही जत शहरात मंगळवारचा आठवडा बाजार भरला होता.कुठेही कोरोनाची भिती दिसत नव्हती.सकाळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी बाजार हटविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अगोदर सुचना दिली नाही म्हणून काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध केला.दिवसभर विना मास्क नागरिकांचा वावर सुरू होता.‌ सोशल डिस्टसिंगचा फज्जा‌ उडाला होता.सांयकाळी पुन्हा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा‌ प्रयत्न केला.मात्र या सर्व घडामोडीत‌ पोलिस अधिकारी व कर्मचारी कोठेही आढळून आले नाहीत.


जत नगरपरिषदचे कर्मचारी दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते.