संख केंद्रातील डॉक्टर गैरहजर

संख :संख (ता.जत) येथील प्राथमिक
आरोग्य केंद्रातील डॉक्टर दोन
दिवसांपासून हजर नसल्याने डॉक्टरविना रुग्ण तपासणी,लसीकरण केंद्र सुरू आहे.
अत्यावश्यक सेवेमध्ये आरोग्य सेवेचा
समावेश असतानासुद्धा आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरपैकी एक डॉक्टर रजेवर, तर दुसरे डॉक्टर अनुपस्थित आहेत.ऐन कोरोना काळात आरोग्य केंद्राची अवस्था असून अडचण, नसून खोळांबा अशी झाली आहे. रुग्णांवर ताटकळत वाट पाहण्याची वेळ आली आहे.संख आरोग्य केंद्राला 2008 मध्ये राज्यस्तरीय आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे.
 दवाखान्याची सुसज्ज इमारत आहे. आरोग्य केंद्रात 16 गावे समाविष्ट आहेत. यामध्ये संख,?अंकलगी, गोंधळेवाडी, दरीबडची,लमाणतांडा (दरीबडची ), खंडनाळ, तिल्याळ, जालिहाळ खुर्द, सिद्धनाथ,मुचंडी, दरीकोणूर, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, धूळकरवाडी, मोटेवाडी, पांडोझरी ही गावे आहेत. दरीबडची, अंकलगी,आसंगी तुर्क, मुचंडी, संख, आसंगी(जत) ही 6 उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये दोन डॉक्टर कार्यरत आहेत.
अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे
शासनाचे आदेश असतानासुध्दा
दोनपैकी एक डॉक्टर रजेवर तर दुसरे
डॉक्टर अनुपस्थित आहेत. डॉक्टरविना
रुग्णांना औषधे दिली जात आहेत.