हजेरीसाठी चालक,वाहकांचा जीव धोक्यात

जत : जत बसस्थानकातून अत्यावश्यक सेवेसाठी अवघ्या पाचच फेऱ्या सुरू आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या अट्टाहासापोटी 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व बसण्याची कोणतीही सोय नसताना सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सहीसाठी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालता का, असा सवाल आगार व्यवस्थापकांना उपस्थित केला.शनिवारी दुपारी सर्वच कर्मचाऱ्यांनी सहीसाठी एकाच ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी अधिकारी व चालक, वाहक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. अत्यावश्यक सेवा बजावत असताना सर्वांचेच लसीकरण झाले नाही. गर्दीमुळे संसर्ग होऊ शकतो. यांची जबाबदारी आगार व्यवस्थापक स्विकारणार का? अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांनी जाब विचारला.