खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्याला मिळाला ऑक्‍सिजनचा टॅंकर

सांगली : सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने
जिल्ह्याला नियमित ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. यामुळे कोरोना महामारीच्या संकटात ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. कनार्टकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून हा ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासाठी सहकार्य केले, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांची
संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने गंभीर होणाऱ्या या रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची गरज असते. मात्र सध्या ऑक्‍सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची गरज भागवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी संपर्क साधून ऑक्‍सिजन उपलब्ध करण्याची
विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील जेएसडब्ल्यू कंपनीशी संपर्क साधून खासदार संजयकाका पाटील यांच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यात ऑक्‍सिजन टॅंकर पुरवण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेएसडब्ल्यू
कंपनीच्या व्यवस्थापनाने खासदार संजयकाका पाटील यांना सांगली
जिल्ह्यासाठी ऑक्‍सिजन टॅंकर देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार
जिल्ह्याला आज एक ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. 


इथून पुढे हा ऑक्सिजन टॅंकरचा पुरवठा असाच सुरु ठेवण्याबद्दलही जेएसडब्ल्यू कंपनीकडून ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला असल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.