जतेेेत आपात्कालीन यंत्रणा आहेच कोठे?आरोग्य,पालिकेची यंत्रणा अपुरी

जत : शहरात कोरोनोची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी जी पालिकेची यंत्रणा सक्रिय होती ती आता दिसत नाही. वैद्यकीय साहित्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मर्यादा ठीक, परंतु अनेक बाबतीत यंत्रणेचे नियंत्रण ढिले झाल्याचे दिसत आहे. त्याचेच परिणाम म्हणून हेल्पलाइन सुरू केली असली तरी त्यातून बेड मिळत नाही की ऑक्सिजन ! अगदी मृतदेह नेण्यासाठीदेखील रुग्णवाहिका किंवा शववाहिका मिळत नाही अशी गंभीर अवस्था ओेढावली आहे.
जतमध्ये गेल्या महिना भरात अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. त्यामुळे पालक संस्था म्हणून पालिकेकडून अपेक्षा आहेत. परंतु गेल्या वेळी अत्यंत संकट काळात ज्या सजगतेने यंत्रणा कार्यप्रवण होती तसे होताना दिसत नाही. नागरिकांसाठी खूप काही केल्याची हवा तयार करण्यात येते परंतु प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कितपत लाभ होतो, याचे ऑडिट करण्याची वेळी आली आहे.
खासगी यंत्रणेतील नफेखोरी, अवास्तव आकारणी या सर्व बाबी समजण्यासारख्या आहेत. मात्र, त्या राेखण्याची यंत्रणा पालिकेकडे असताना त्याचा प्रभावी उपयेाग होताना दिसत नाही. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांच्या हाल अपेष्टा केव्हा थांबणार हा प्रश्न आहे.