बेकायदा दारू अड्ड्यावर छापा,मोठा दारूसाठा जप्त | उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जत,संकेत टाइम्स : करजगी,उटगी ता.जत येथे बेकायदा दारू साठा अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत 84 हजार 92 रुपयाची दारूसाठा जप्त केला.याप्रकरणी अमीर गौसपीर व्हसट्टी रा.करजगी,भिमशा तम्माराया कोळी,सिद्रय्या सिध्दाप्पा कोळी,परशूराम मळसिध्दाप्पा कोंजारी (रा.उटगी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विक एंड लॉकडाऊनच्या‌ पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कचे निरिक्षक सी.वाय.वळसे,दत्तात्रय चव्हाण,संजय वाडेकर यांच्या सुंयक्त पथकाने जत तालुक्यात मोहिम राबविली त्यात करजगी येथे अमीर व्हसट्टी यांच्या चायनीज सेंटर व घरात साठा केलेली,व उटगी येथील भिमशा कोळी,सिद्रय्या कोळी,परशूराम कोंजारी यांच्या बेकायदा सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला.


त्यात देशी,विदेशी मद्याचे एकूण‌ 22 बॉक्स,60 लिटर ताडी असा 84 हजार 92 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.अवैध दारू विक्री कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयितांना प्रतिबंधित कारवाईचे नोटिस देऊन सोडून देण्यात आला आहे.


जत तालुक्यातील उटगी,करजगी येथे बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकत जप्त केलेला मुद्देमाल